अभिनेता संजय दत्तविरोधात अटक वॉरंट जारी
एबीपी माझा वेब टीम | 15 Apr 2017 08:19 PM (IST)
मुंबई: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तविरोधात पुन्हा पोलीस कारवाई सुरु झाल्याचं दिसतं आहे. कारण संजय दत्तविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. चेक बाउन्सप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच जेलमधून सुटलेला संजय दत्तविरोधात कोर्टानं अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा संजय दत्तला अटक होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काय आहे नेमकं प्रकरण? 2002 साली दिग्दर्शक शकील नुरानी यांनी संजय दत्त विरोधात कोर्टात खटला दाखल केला होता. शकील नुरानी हे ‘जान की बाजी’ हा सिनेमा तयार करत होते. या सिनेमात संजय दत्त लीड रोलमध्ये होता. या चित्रपटासाठी संजय दत्तला शकील नुरानींनी 50 लाख रुपये दिले होते. मात्र, संजय दत्त दोनचं दिवस शुटींगसाठी आला. यामुळे आपलं पाच कोटीचं नुकसान झाल्याचा दावा नुरानींनी केला. याप्रकरणी दाद मागण्यासाठी नुरानी यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. हायकोर्टानं पैसे परत करण्याचे संजय दत्तला आदेश दिले. त्यानंतर संजयनं जो चेक नुरानी यांना दिला तो बाउंस झाला. चेक बाउंस झाल्यानं नुरानींनी पुन्हा एकदा कोर्टात धाव घेतली. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टानं दोन ते तीन वेळी संजय दत्तला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण कोर्टाच्या आदेशानंतरही तो हजर न राहिल्याने आज अंधेरी मेट्रोपॉलिटियन मेजेस्ट्रिट कोर्टानं त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं. दरम्यान, सोमवारी यावर सुनावणी होणार असून तेव्हा संजय दत्त आणि त्याचे वकील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.