मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मागील एक आठवड्यापासून ते रुग्णालयातच आहेत.


यासंदर्भात ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांना फोनवरुन विचारणा केली असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, "ऋषी कपूर यांना रुग्णालयात दाखल केलं आहे, परंतु काळजी करण्यासारखं काही कारण नाही. ऋषी कपूर यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. शिवाय कॅन्सरवरही उपचार सुरु आहेत. त्यामुळे त्यांना सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे."


परंतु सूत्रांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, "कॅन्सरच्या आजारातील गुंतागुंतीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते मागील एक आठवड्यापासून तिथेच आहेत. यावेळी उपचारादरम्यान त्यांना अनेक वेळा व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं."


ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंह या देखील सध्या त्यांच्यासोबत रुग्णालयात असून त्यांची देखभाल करत असल्याचं समजतं.


ऋषी कपूर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून कॅन्सरचा इलाज करुन मुंबईत परतले होते. या उपचारादरम्यान ऋषी कपूर अमेरिकेतील रुग्णालयात 11 महिने आणि 11 दिवस होते. तिथून परतल्यानंतर उपचार यापुढेही सुरु राहतील आणि ठणठणीत बरं होण्यासाठी काही काळ लागेल, असं त्यांनी सांगितलं होतं.


न्यूयॉर्कहून परतल्यानंतर ऋषी कपूर 'द बॉडी' नावाच्या चित्रपटात काम केलं होतं. या सिनेमात त्यांच्यासोबत इम्रान हाश्मी आणि शोभिता धुलिपाला प्रमुख भूमिकेत होत्या. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळालं नाही.


न्यूयॉर्कमध्ये उपचारादरम्यान ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर आणि त्याची गर्लफ्रेण्ड आलिया भट यांच्यासह दीपिका पादूकोण, शाहरुख खान, आमीर खान, अनुपम खेर यांसारख्या अनेक कलाकारांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली होती. स्वत: ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांनीही सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले होते.