पंढरपूर : राज्यात एचएससी अर्थात बारावीची परीक्षा उद्यापासून सुरु होत आहे. 'सैराट' चित्रपटामुळे दोन वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु बारावीच्या परीक्षेला बसत आहे. मात्र 'आर्ची'ला चाहत्यांचा त्रास होऊ नये, यासाठी सोलापुरातील महाविद्यालयाकडून पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.
रिंकू टेंभुर्णीमधील एका महाविद्यालयातील केंद्रातून बारावीची परीक्षा देणार आहे. यावेळी तिला चाहत्यांचा उपद्रव होऊ नये, म्हणून संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अधिकाधिक पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी टेंभुर्णी पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.
दोन वर्षांपूर्वी 'सैराट' चित्रपट हिट झाल्यावर रिंकू राजगुरुने अकलूजमधील केंद्रावर दहावीची परीक्षा दिली होती. तेव्हा तिला 66 % गुण मिळाले होते.
चाहत्यांकडून होणारा त्रास टाळण्यासाठी रिंकूने शाळा सोडून बाहेरुन बारावी परीक्षेसाठी बोर्डाकडे फॉर्म भरला होता. त्यानुसार तिचा बैठक क्रमांक टेंभुर्णीतील परीक्षा केंद्रावर आला.
डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या रिंकूचं आयुष्य 'सैराट'नंतर पूर्णपणे बदलून गेलं आणि ती कला शाखेची विद्यार्थिनी झाली. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातील मुख्य भूमिकेनंतर तिच्यावर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ लागला. सैराटच्या कन्नड आवृत्तीमध्ये भूमिका केल्यानंतर ती आता 'कागर' सिनेमात झळकणार आहे.
रिंकू बारावीच्या परीक्षेला, चाहत्यांचा त्रास टाळण्यासाठी अतिरिक्त पोलिस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Feb 2019 04:46 PM (IST)
अभिनेत्री रिंकू राजगुरु टेंभुर्णीमधील एका महाविद्यालयातील केंद्रातून बारावीची परीक्षा देणार आहे. यावेळी तिला चाहत्यांचा उपद्रव होऊ नये, म्हणून संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अधिकाधिक पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी टेंभुर्णी पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -