मुंबई : पैशांच्या मोबदल्यात राजकीय पक्षांच्या अजेंड्याचा प्रचार सोशल मीडियावर करण्यासाठी बॉलिवूडमधील 30 पेक्षा जास्त सेलिब्रिटींनी होकार दिला आहे, असा दावा ऑनलाईन पोर्टल कोब्रा पोस्टने केला आहे. कोब्रा पोस्टने या संदर्भात एक स्टिंग ऑपरेशन केलं असून यात जॅकी श्रॉफ, कैलाश खेर, सोनू सूद आणि विवेक ओबेरॉय सापडले आहेत. विशेष म्हणजे विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिकही करत आहे.

कोब्रा पोस्टने 'ऑपरेशन कराओके' नावाचं स्टिंग ऑपरेशन केलं. या स्टिंग ऑपरेशनअंतर्गत पोर्टलच्या रिपोर्टर्सनी पीआर कंपनीचे प्रतिनिधी म्हणून अभिनेते, गायक, डान्सर आणि टीव्ही कलाकारांच्या मॅनेजरशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डील करण्यासाठी संपर्क साधला.

याबाबत एका पत्रकार परिषदेत बोलताना कोब्रा पोस्टचे संपाद अनिरुद्ध बहल म्हणाले की, "संबंधित राजकीय पक्षाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सुमारे 36 सेलिब्रिटी आपापल्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेसेज पोस्ट करण्यास तयार झाल्याचं स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसत आहे."

सेलिब्रिटींनी केलेले ट्वीट त्यांचेच वाटावेत, यासाठी त्यांना सोशल मीडिया पेजवर पोस्ट करण्यासाठी विविध मुद्द्यांवरील माहिती पुरव्यासाठी त्यांनी होकार दिल्याचा आरोप अनिरुद्ध बहल यांनी केला.

कोब्रा पोस्टच्य स्टिंग ऑपरेशननुसार, "भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या पक्षांवर प्रश्न  उपस्थित होत आहेत." "बरेच सेलिब्रिटी त्यांचा पॅन नंबर आणि बँक खात्याचा नंबर शेअर करण्यास तयार झाले, पण अनेकांनी रोख रकमेला प्राधान्य दिलं," असा दावाही अनिरुद्ध बहल यांनी केला.


स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडलेल्या सेलिब्रिटींचे व्हिडीओ कोब्रा पोस्टने ट्विटरवर शेअर केले आहेत. यानंतर अभिनेता सोनू सूदने परिपत्रक जाहीर करुन संबंधित प्रतिनिधींशी झालेला संवाद चुकीच्या पद्धतीने मांडल्यांचं म्हटलं आहे.


कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशननुसार, बऱ्याच सेलिब्रिटींनी प्रस्तावाला होकार देण्याआधी 2 लाखांपासून 50 लाख रुपयांच्या फीची मागणी केली. काहींनी तर आठ महिन्यांच्या करारासाठी 20 कोटी रुपयेही मागितले. फी रोख रकमेत दिली जाईल असं सांगितल्यावर कोणीही काळ्या पैशांना नाही म्हटलं नाही.


तर काही सेलिब्रिटींनी उत्साह दाखवण्यासाठी पैसे घेण्याआधीच ट्वीट केल्याचं कोब्रा पोस्टने म्हटलं आहे.

मात्र काही सेलिब्रिटींनी राजकीय पक्षांना सोशल मीडियावर प्रमोट करण्यासाठी नकार दिल्याचंही कोब्रा पोस्टने सांगितलं. "आम्ही विद्या बालन, अर्शद वारसी, रजा मुराद आणि सौम्या टंडन यांच्याकडे गेलो असता त्यांनी थेट नकार दिला," असंही कोब्रा पोस्टने म्हटलं.


जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, सोनू सूद आणि विवेक ओबेरॉय यांच्यासह, मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे, सनी लिऑनी, शक्ती कपूर, अमीशा पटेल, टिस्का चोप्रा, राखी सावंत, पंकज धीर, निकितन धीर, पुनीत इस्सार, राजपाल यादव, मिनिषा लांबा, महिमा चौधरी, रोहित रॉय, अमन वर्मा, कोयना मित्रा आणि राहुल भट हे पैशांच्या मोबदल्यात राजकीय पक्षांचा प्रमोट करणारे ट्वीट करण्यास तयार झाले.

याशिवाय गायक दलेर मेहंदी, मिका सिंह, अभिजीत भट्टाचार्य आणि बाबा सहगल, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव, कृष्णा अभिषेक, व्हीआयपी यांचाही यात समावेश आहे.

तर टीव्ही कलाकार हितेन तेजवानी आणि त्याची पत्नी गौरी प्रधान हेदेखील या यादीत सामील आहे. "आम्ही एकही पैसा घेतलेला नाही, पण आम्ही पैसे घ्यावेत, जेणेकरुन ते आमचं स्टिंग करतील, असा कोब्रा पोस्टचा उद्देश होता. त्यांनी अर्धवट संभाषण दाखवून खोटे आरोप केले आहेत," असा दावा हितेन आणि गौरीने केला आहे.