अभिनेता अनुपम खेर यांची अभिनय कारकीर्द मोठी आहे. सारांशसारखा आपला पहिलाच सिनेमा करताना त्यांनी कमाल केली होती. पुढे आपल्या प्रत्येक चित्रपटात भूमिका करताना, त्या भूमिकेचा आवाका त्यांनी समजून घेतला. अर्थात सारांशसारखी भूमिका पुन्हा पुन्हा वाट्याला येण्यासाठी नटाला वाट पाहावी लागते. तोवर पदरी पडलेल्या भूमिका निभवाव्या लागतात. बऱ्याच वर्षांनी खेर यांच्या वाट्याला अशीच एक मोठी भूमिका आली आहे ती या चित्रपटाच्या निमित्ताने. द अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या डॉक्टर मनमोहन सिंह यांच्यावर बेतलेल्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका खेर यांच्या पदरी पडली आणि आता हा अभ्यासू नट त्याचं सोनं कसं करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. ही उत्सुकता वाढत असतानाच सिनेमाचा ट्रेलर आला आणि तर्क वितर्काला ऊत आला. काहींना वाटलं डॉ. सिंह यांची यात चेष्टा केली गेली आहे. काहींना तो भाजपचा डाव वाटला तर या चित्रपटातून सोनिया गांधी यांना खलनायिका बनवण्याचा घाट घालण्यात आल्याचा वास काहींना आला. या सगळ्या शंकांमधून आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याल गांधी घराणं आणि त्यांच्या भवतालची मंडळी, यात अहमद पटेल, नविन पटनायक, सीताराम येचुरी, कपिल सिब्बल, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, सोमनाथ चॅटर्जी, पृथ्वीराज चव्हाण अशी बरीच मंडळी दिसतात. त्या सगळ्यांच कास्टिंग कमाल झालं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेत रमेश भाटकर झळकले आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या भवताली कशी सिस्टिम असते, पीएमओ कार्यालय नेमकं काय करतं, अंतर्गत कलह कसे सुरु असतात हे सगळं दिसतं. पण ते दिसत असताना पंतप्रधान म्हणून मनमोहन सिह काय विचार करत होते, एकेकाळी मनमोहन सिंह यांचं नाव सुचवणाऱ्या सोनिया यांचं आणि पंतप्रधानांचं कुठून बिनसायला सुरुवात झाली आदी अनेक गोष्टींचा थांग लागत नाही. नुसत्या वरवर गोष्टी येऊन जातात. त्यामुळे विनाकारण काही माणसं खलनायकी वाटतात. शिवाय चित्रपटाच्या शेवटी राहुल गांधी यांचीही मुद्दाम खिल्ली उडवण्यात आली आहे. भाजपप्रणित सरकार सत्तेवर आल्यानंतर यूपीए सरकारवर मारण्यात आलेले ताशेरेही यात दाखवण्यात आले आहेत. यातून हा चित्रपट कादंबरीपुरता न उरता त्यातून छुपा अजेंडा पेरला जातोय की काय असं वाटू लागतं.
एक नक्की की अनुपम खेर, अक्षय खन्ना आदी सर्वांनीच उत्तम कामं केली आहेत. पीएमओ ऑफिस आणि एकूणच पंतप्रधानांचं घर याची उभारणी नेटकी झाली आहे. डॉ. सिंह यांचा कस लागणारे अनेक प्रसंग यात दिसतात. पण सांगितलं तसं, एकूण कथा, पटकथा, त्याची मांडणी ही विषयाला धरुन असली तरी ती नेमकी नाही. त्यामुळे हा चित्रपट निराश करतो.
पिक्चर बिक्चरमध्ये म्हणूनच या चित्रपटाला मिळतात अडीच स्टार. हा चित्रपट पाहताना दिल्लीतला माहोल उभा राहतो. पण पडद्यावर दिसणारी माणसं अपवाद वगळता मनात नेमकी ठसत नाहीत. असो.