लय भारी हा सिनेमा आला आणि रितेश देशमुख हे हिंदीत झळाळून उठलेलं मराठी नाव चर्चेत आलं. लय भारी चालला. त्यानंतर रितेशने दुसऱ्या सिनेमाची जुळवाजुळव सुरु केली. त्याचं नाव होतं माऊली. या सिनेमात रितेश आणि अजय अतुल सोडले तर तशी नवी टीम होती. म्हणजे, यात जीतेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सैयमी खेर ही मंडळी होतीच. पण याचा दिग्दर्शक आणि लेखक बदलला होता. आता ती धुरा होती आदित्य सरपोतदार आणि क्षितीज पटवर्धन यांच्यावर. आदित्यने यापूर्वी नारबाची वाडी, फास्टर फेणे, क्लासमेट्स असे सिनेमे केले आहेत. तर क्षितीजने लेखन केलं आहे, डबलसीट, वायझेड या सिनेमांचं. दोन स्पेशल हे नाटकही त्याने लिहिलेलं आणि दिग्दर्शिक केलेलं. सांगायचा मुद्दा असा की माऊली करताना दोन नवे शिलेदार निवडले गेले. अशी अनुभवी मंडळी जेव्हा सिनेमा बनवतात तेव्हा त्या सिनेमाकडून अपेक्षा निर्माण होतात. आता मुद्दा असा, की त्या अपेक्षांना हा सिनेमा पुरा पडतो का.. तर त्याचं उत्तर हो असं देता येईल. कारण, हा केवळ आणि केवळ मसालापट आहे. आणि तो कमालीच्या कन्व्हिक्शनने मांडला आहे. आपल्याला नेमकं काय करायचं आहे, हे स्वच्छ असल्यामुळे त्याचा फायदा या सिनेमाला झाला आहे. सिनेमा पाहून बाहेर पडताना आपण एक अस्सल संवादांनी भरलेला आणि हाणामारीने भारलेला असा हा सिनेमा पाहताना गमजा येते.
सिनेमाची स्टोरी साधी सरळ आहे. माऊली सर्जेराव देशमुख पोलीस आहे. त्याची आता बदली नव्या गावात झाली आहे. या गावात सत्ता आहे ती नानाची. इथे नानाचे टॅंकर आहेत. नानाची दारुची भट्टी आहे. नानाचा बांधकामांचा व्यवसाय आहे. हे जे सगळं आहे ते बेकायदेशीर असलं तरी कोणी त्याला हात लावू शकत नाही. कारण कोणीही समोर असलं तरी नाना त्याचा खात्मा करतो. अशा गावात माऊली अवतरतो आणि त्याला गावकऱ्यांवर असलेली नानाची दहशत समजते. तो नानाला धडा शिकवायचा ठरवतो. पण... माऊलीचे एकेक गेम उलटे पडू लागतात. पुढे काय होतं .. तो नानाला कसा घडा शिकवतो याचा हा सिनेमा.
मूळात या गोष्टीत माऊलीचा विषय होतो हे ओघानं आलंच. पण तो कसा होतो ते पाहणं मसालेदार आहे. या सिनेमात काही चकित करणाऱ्या गोष्टीही आहेत. साधी सरळ वाटणारी गोष्ट पटकथेमुळे रंजक बनली आहे. त्यासोबतीला टाळ्या वसूल संवाद आहेतच. माऊलीसमोर मान खाली आणि माज घरी ठेवून यायचं, माऊली नाराज नाय करनार, आलो होतो भावासाठी.. आता थांबणार गावासाठी असे एकापेक्षा एक संवाद जबरा झाले आहेत. याला उत्तम साथ छायांकनाची आणि पार्श्वसंगीताची आहे. कलाकारांच्या अभिनयाबाबत बोलायचं तर यात रितेश देशमुख आणि जीतेंद्र जोशी हे दोन हुकमी एक्के बनले आहेत. खलनायक जेवढा मोठा तेवढी नायकाची प्रतिमा मोठी होते. म्हणूनच या सिनेमात जीतेंद्र जोशी यांनी साकारलेला नाना मजा आणतो. तर रितेश यांचा माऊली धमाल आणतो. हळवा माऊली आणि इरसाल माऊली यांतला फरक नेमका आहे. रितेश यांनी दे-मार दृश्यही कमाल साकारली आहेत. हिंदी सिनेमात आपण बऱ्याचदा हाणामारी पाहतो. तरी या सिनेमाते सिक्वेन्स वेगळे वाटतात. रंजन करतात. या सिनेमात हाणामारी आहेच, पण काही प्रमाणात रितेश यांनी विनोदी प्रसंगही साकारले आहेत. त्यामुळे ही दुहेरी तलवार त्यांनी पेलली आहे. सिद्धार्थ जाधव, श्रीकांत पाटील यांची कामंही नेटकी. तर सैयमी खेर दिसायला सुंदर आहेच. पण रेणुका या भूमिकेला असलेल्या छटा आणखी ठाशीव हव्या होत्या असं वाटून जातं. अर्थात सिनेमाचा आत्मा रितेश आणि जितेंद्रभोवती फिरत असल्यामुळे सिनेमा तरतो.
सिनेमात अडचण आहे ती उत्तरार्धात. नानाच्या दहशतीसमोर हतबल झालेल्या माऊलीला साक्षात्कार होतो. पण तो साक्षात्कार आहे, की स्वत्वची जाणीव आहे की भास आहे की आणखी काही नवा प्रत्यय त्यात जरा गोंधळ दिसतो पण त्यानंतर सिनेमा एका निर्णयावर येतो. यातली साहसदृश्य जबर आहेत. फक्त कधीमधी यातल्या स्लोमोशन्स जरा जास्त झाल्यात की काय असं वाटून जातं. अर्थात छायांकनात बारकावे टिपल्यामुळे तो वेग भरुन निघतो.
हा सिनेमा भव्य झाला आहे. आपल्याला अस्सल मसालापटच बनवायचा आहे हे दिग्दर्शकाच्या मनात पक्कं आहे हे या सिनेमातून कळतं. म्हणून तो आपलं पुरेपूर रंजन करतो. मजा आणतो. सिनेमा बघून बाहेर पडताना मजा येते. मराठीत असे मसालापट फारसे बनत नाहीत. पण पुरेपूर खर्च करुन हा सिनेमा बनवण्यात आला आहे. तो थिएटरमध्ये पाहतानाच मजा येईल. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला आपण देतो आहोत साडेतीन स्टार्स.
हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहा.