संजय जाधव यांचा सिनेमा असला की या सिनेमात अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, सई ताम्हणकर अशी चमचमती मंडळी असतात. त्यांचा सिनेमाही तसाच मसालेदार. पण लकी त्याला अपवाद होता. या सिनेमात त्यांनी अभय महाजन आणि दिप्ती सती या जोडीला घेऊन मोठा सुखद धक्का दिला. आता काहीतरी गमतीदार पाहायला मिळणार असं कुतूहल निर्माण होतं. पण लकी चित्रपट सुरू झाल्यापासून प्रेक्षकांवर एकामागेएक फ्रेम्स आदळू लागतात आणि या सिनेमातली, गोष्टीतली मजा निघून जाऊ लागते. सिनेमावर तंत्र प्रभाव गाजवू लागतं. छायांकन, संकलन, पार्श्वसंगीत या इतर अंगांनी हा सिनेमा पहिल्यापासून इतका लाऊड होतो की यात इमोशन्स नावालाही उरत नाहीत. पर्यायाने ही गोष्ट आणि त्यातला सगळा पसारा कोरडा, नाहक वाटू लागतो.
ही गोष्ट लकीची आहे. लकी एक अत्यंत सोबर मुलगा. पण तो काही करायला गेला तरी ती गोष्ट उलटीच होते. त्याच्या इतर मित्रांना मैत्रिणी आहेत. पण लकीचा शोध मात्र काही केल्या संपत नाहीय. अशात त्याची गाठ पडते काॅलेजमधल्या मुलीशी पडते. तीच त्या सिनेमाची नायिका. तर त्याला तिला पटवायची असते आणि ही बाब तिला समजते. मग ती त्याला अद्दल घडवायची ठरवते. तर पुढे या दोघांचं काय होतं.. कोण कुणाला कशी अद्दल घडवतं.. त्याची ही गोष्ट आहे.
सिनेमा सुरु होतोच गाण्यापासून. लकी.. याच्या नावातच ल आहे.. असं काहीसं ते गाणं. या गाण्यात सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव अशी मंडळी आहेत. गाणं चकाचक आहे. पण पहिल्या क्षणापासून ते अंगावर येतं. त्यातल्या फ्रेम्स.. संकलन.. इतकं जलद झालं आहे की एक ना धड कुणालाही नीट पाहता येत नाही. पण ती गाण्याची ठेवण आहे असं समजू. इथून गाणं सुरु होतं आणि लकी आपल्याला त्याची गोष्ट सांगू लागतो. मुळात या गोष्टीला फार जागा नाही. तिचा जीव अत्यंत छोटा आहे. त्याचा सिनेमा करताना यात अनेक प्रसंग मुद्दाम समाविष्ट करण्यात आले आहेत. ते समाविष्ट करताना त्यातून विनोद निर्मिती कशी होईल याची काळजी घेतली गेलेली दिसते. त्यामुळे हट्टाने विनोद असा प्रकार होतो. अनेक संवाद, प्रसंगांची पुनरावृत्ती खटकत राहते. कोणतीही व्यक्तिरेखा कोणत्याही प्रसंगात बेमालून घुसताना दिसते. त्याला स्थळ, काळ वेळाची कोणतीही फूटपट्टी नाही. मग तो गोवा बंदचा सीन असो किंवा कोंबडा पळवण्याचा किंवा अगदी कंबरेत टायर बसवून पळण्याचा सीन असो.. हा सगळा काॅमेडीचा अट्टहास वाटतो. प्रत्येक व्यक्तिरेखा कॅरिकेचर करण्याचा हट्टही इथे अंगलट आला आहे. खुद्द लकी, लकीचा मित्र, लकीचा बाप अशी सगळी मंडळी स्लॅपस्टिक अभिनय करत राहतात. यामुळे हा सगळा प्रकार हस्यास्पद होतो. या सिनेमाला कुठेही ठहराव नाही. अत्यंत जलदगतीने सिनेमा घडत जातो. हा सिनेमा कुठेही भिडत नाही. सिनेमा हा भावनांचं गाठोडं आहे असं म्हणतात. पण हा सिनेमा भिडत नाही. डोळ्यांसमोर दिसणाऱ्या लाऊड हालचाली आपण पाहात राहतो.
या चित्रपटातली गाणी ताल धरायला लावतात. पण याचं पार्श्वसंगीत मात्र खूपच जुनाट आहे. सिनेमाला उत्तम तंत्राची जोड आहे. पण कथा, पटकथा, संवाद यांच्यापेक्षा सिनेमावर तंत्राचा पगडा दिसतो. त्यामुळे हा चित्रपट तांत्रिक वाटू लागतो. म्हणूनच पिक्चरबिक्चरमध्ये या सिनेमाला मिळतो आहे दीड स्टार. हा सिनेमा सर्वच पातळ्यांवर अपेक्षाभंग करतो. तो ना धड रंजन करत ना धड भावोत्कट सफर घडवत. ना घड पोट धरुन हसवत ना तो प्रणयाच्या लाटांवर स्वार होत. थोडक्यात यावेळी इटस अनलकी.