भाई - व्यक्ती की वल्ली पूर्वार्ध संपला आणि तेव्हाच उत्तरार्धाची उत्सुकता वाढली. कारण उत्तरार्धात बाबा आमटे, बाळासाहेब ठाकरे, विजया मेहता, भक्ती बर्वे अशी बरीच मातब्बर मंडळी या सिनेमात दिसणार याची चाहूल लागली होती. पुलंचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रामाणिक प्रयत्न पाहता दुसऱ्या भागात पुलंचं समाजिक जगणं दिसेल अशी शक्यता होती. कारण पहिल्या भागात पुलंचं कौटुंबिक आयुष्य ठाशीवपणे दाखवण्यात आलं होतं. ही एक बाब. त्याचवेळी पहिला भाग आल्यानंतर या सिनेमावर उठलेली टीकेची झोड पाहता दुसऱ्या भागावर त्याची छाया येणं स्वाभाविक होतं. तर अशा सगळ्या मानसिकतेत आपण भाई.. उत्तरार्ध पाहायला बसतो.
खरंतर भाई.. हा पुलंचा चरित्रपट नाही. म्हणजे, चरित्र दाखवण्यापेक्षा यातून व्यक्तिमत्व प्रतिबिंबीत होणं दिग्दर्शकाला जास्त महत्वाचं वाटत असावं, खरंतर ते जास्त आवश्यक. कारण चरित्रपट करताना मतमतांतरं असू शकतात. पण एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवताना विशेषत: पुलंसारख्या माणसाचं व्यक्तिमत्व दाखवताना त्यात मतांतरं होऊ नयेत. मग मुद्दा पुढचा येतो, की व्यक्तिमत्व ठरतं कशावरुन? माणूस वेगवेगळ्या प्रसंगांत जे निर्णय घेतो, जी भूमिका मांडतो. जो पवित्रा घेतो त्यातून त्याचं व्यक्तिमत्व उभं राहतं. पुलं उत्तम लेखक होतेच. पण दूरदर्शनचे ते पहिले प्रोड्युसर होते. पहिले स्टॅंडअप काॅमेडीअन होते. लोकांचं स्वप्नरंजन करताना आणीबाणीवेळी किंवा महाराष्ट्र भूषण स्वीकारताना त्यांनी धाडसाने पण नेमस्तपणे केलेलं भाषण कमाल होतं. अशाच अनेक प्रसंगांतून व्यक्तिमत्व घडत जातं. पटकथेमध्ये अशा नेमक्या प्रसंगांचा भरणा असणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. शिवाय त्याचे संवाद. कथा, पटकथा आणि संवाद यांच्या पातळीवर हा चित्रपट नेमका आणि नेटका बांधल्यामुळे पुढचं काम सोपं झालं आहे.
उत्तरार्धातला चित्रपट सुरु होतो तो हाॅस्पिटलमधून. पहिला भाग पाहिलेल्यांना त्याचा संदर्भ लगेच लागेल. पण ज्यांनी तो पाहिला नाही त्यांना काही वेळाने त्यातली सलगता लक्षात येईल. पुलंच्या अनेक व्यक्तिरेखांची नावं इथे बदलण्यात आली आहेत. पुलंच्या आयुष्यात आलेले अनेक प्रसंग दाखवताना त्या प्रसंगांभवती आपल्याला माहित असलेली अनेक दिग्गज मंडळी दिसतात. अनेक हळूवार प्रसंग या सिनेमातही आले आहेत. सुनिता बाईंना बोलून दाखवलेलं शल्य, कुमारांची तब्येत बरी नसताना चंपूताई, माणिकबाई, भीमसेन जोशी, वसंतराव आणि पुलं यांनी जमवलेली मैफल.. आमटेंच्या आनंदवनात गेल्यानंतर पुलंना आलेले अनुभव, मुक्तांगणशी असलेलं नातं अशा अनेक बाबी यात दिसतात. हिमालयाएवढ्या उंचीच्या माणसाचं आभाळाएवढं काम काही तासात बसवणं हे सोपं नव्हतं. पण ते दिग्दर्शकाने उत्तमरित्या पार पाडलं आहे. याला साथ उत्तम संगीताची आणि पार्श्वसंगीताची.
संपूर्ण सिनेमात किंचित ढोबळ वाटतो तो बारक्या. व्यक्ति आणि वल्लीमधल्या बबडूची आठवण करुन देणारा. गिरीश कुलकर्णी यांनी तो साकारला गमतीदार आहे. पण इतर व्यक्तिरेखांच्या तुलनेत तो कॅरिकेचर वाटतो. बाकी सारंग साठ्ये, नीना कुलकर्णी, दिप्ती लेले, संजय खापरे, विकास पांडुरंग पाटील आदींच्या भूमिका उत्तम वठवलेल्या.
या उत्तरार्धाला पिक्चरबिक्चरमध्ये मिळताहेत चार स्टार्स. हा सिनेमा आवर्जून पाहा. पुलंच्या व्यक्तिमत्वाचा नेमका अंदाज हा चित्रपट देतो.