गेल्या काही वर्षांपासून टीव्ही, सिनेमांसह सगळ्याच माध्यमांमध्ये लहान मुलांचा शिरकाव झाला आहे. लहान मुलांना मिळणारा टीआरपी, घराघरात तयार होणारे त्यांचे फॅन्स आणि रिअॅलिटी शोंमुळे मिळणारं ग्लॅमर या सगळय़ामुळे लहान मुलांना आणि त्याच्या पालकांना या क्षेत्राची ओढ वाटू लागली. पण त्याची दुसरी बाजूही होती. इथे काम करायचं तर पैसा, ग्लॅमर आहेच. पण, त्यासाठी करावे लागणारे कष्टही अमाप आहेत. त्याच्या शिफ्ट्स आणि त्यातून होणारी दमणूक छोट्या जीवाला मानवेलच असं नाही. त्यातून अनेक गोष्टी उद्भवतात. ही झाली मुलांची स्थिती. त्याबरोबरच, पालकांनाही या झगमगत्या दुनियेची भुरळ पडते. त्यातून मग अपेक्षांचं लादणं येतं. हीच गोष्ट घेऊन दिग्दर्शक रोहित शिलवंत आपल्यासमोर आले आहेत. 'परी हूं मैं' हा त्यांचा पहिला सिनेमा. या सिनेमातून खूप महत्वाची गोष्ट त्यांनी मांडू पाहिली आहे.
दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच सिनेमा असल्यामुळे यातला नवखेपणा सगळीकडे दिसत राहतो. सिनेमाचा विषय महत्वाचा असला तरी त्याची गोष्ट मांडताना त्याची हाताळणी सोपी ठेवण्याकडे दिग्दर्शकाचा कल आहे. त्यामुळे सिनेमा घडत जरी योग्य पद्धतीने जात असला, तरी त्यात धक्का देणारे प्रसंग येत नाहीत. अपेक्षित वळणं घेत हा सिनेमा पुढे जातो. त्यामुळे त्यातलं नाविन्य टप्प्याप्याने कमी होत जातं. पटकथेबाबत पूर्वार्ध योग्य पद्धतीने हाताळण्यात आला आहे. पण उत्तरार्धात खरंतर जिथे पालक, मुलगी या दोघांच्या बाबतीत काही मानसिक द्वंद्व सुरू होतं. तिथे हा चित्रपट आणखी खोल जायला हवा होता असं वाटून जातं. विशेषत: या चित्रपटात समुपदेशकाचा प्रवेश झाल्यानंतर त्यातले संवाद, त्याचं चित्रण हे मनाला भिडणारं असायला हवं होतं असं वाटून जातं. खरंतर अर्थाअर्थी याचा एकमेकांशी संबंध नसला, तरी अशावेळी तारे जमीन पर हा सिनेमा आठवतो. त्यातही बाप शिक्षकाला भेटायला जातो. त्यात काही संवाद झाल्यानंतर सालोमन आयलंडचा उल्लेख आहे. अत्यंत कमी शब्दात पण अचूक वेध घेणारा तो प्रसंग त्या सिनेमात येतो. असो. तर अशा पद्धतीचं काहीतरी भरीव तिथे असायला हवं होतं असं वाटून जातं. त्यानंतर बापाच्या बदलेल्या मानसिकतेला अर्थ उरतो. तिथून या सिनेमावरची पकड हातून ढिली होऊ लागते.
नंदू माधव, देविका दफ्तरदार या दोघांनीही समजून कामं केली आहेत. त्यांच्यामुळे सिनेमाचा स्तर वाढतो. त्यात भावनिक ओलावा येतो. तरीही उत्तरार्धात काही प्रसंग असायला हवे होते असं वाटून जातं. तर त्यात धक्कातंत्र आलं असतं. काहीतरी चकित करणारं भिडलं असतं. प्रेक्षकांचे आडाखे चुकून काहीतरी नवं त्यांना पाहता आलं असतं.
सिनेमाच्या इतर तांत्रिक अंगांबद्दल सांगायचं तर छायांकन, संकलन, पार्श्वसंगीत नेटकं आहे. संगीताबाबात त्यातल वेगे वेगे धावू हे गाणं छान जमून आलं आहे. या बाबीमुळे हा सिनेमा नेटका असला, तरी आणखी काहीतरी हवं होतं असं वाटून जातं. त्यातल्या शेवटासाठीही आणखी थोडा वेळ घेतला असता तर बिघडलं नसतं असं वाटून जातं. या बाबींमुळे पिक्चरबिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत अडीच स्टार.
या दिग्दर्शकाकडून आणखी चांगल्या चित्रपटाची अपेक्षा करायला हरकत नाही.
परी हूं मैं : नन्ही कली.. नन्ही परी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Sep 2018 09:48 AM (IST)
पण, त्यासाठी करावे लागणारे कष्टही अमाप आहेत. त्याच्या शिफ्ट्स आणि त्यातून होणारी दमणूक छोट्या जीवाला मानवेलच असं नाही. त्यातून अनेक गोष्टी उद्भवतात. ही झाली मुलांची स्थिती. त्याबरोबरच, पालकांनाही या झगमगत्या दुनियेची भुरळ पडते. त्यातून मग अपेक्षांचं लादणं येतं. हीच गोष्ट घेऊन दिग्दर्शक रोहित शिलवंत आपल्यासमोर आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -