लेथ जोशी? हे असं कुठं नाव असतं काय? जनरली नाव आणि आडनाव असं कॉम्बिनेशन ऐकून सवय असते आपल्याला. लेथ आणि जोशी काय वाट्टेल ते. असं एकीकडे वाटतं. पण नंतर दुसरं मन सांगतं, असं सिनेमाचं नाव जाणून बुजून देणाऱ्याला नेमकं काय म्हणायचं असेल? लेथ मशीन आणि जोशी शिवाय, सिनेमाचं पोस्टर कसं, तर त्यात एक मनुष्य लेथवर काहीतरी करतोय.. असं काहीसं. म्हणजे, लेथ मशीन आणि हा माणूस यांच्याबद्दलची ही गोष्ट असणार.. आहेही तसंच. पण ही फक्त मशीन आणि माणसाची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे, कारागीराच्या कलेची आणि कालौघात गडप होत चाललेल्या त्याचा अस्तित्त्वाची. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं, तर पूर्वी फोटग्राफर असायचे. रोल घालून प्रत्येक फोटो जपून करेक्ट काढणं हे स्कील होतं. फोटो नीट नाही काढला तर तो एक फोटो वाया जायचा. म्हणून लग्न समारंभ, घरगुती सोहळे अशा कार्यक्रमात फोटोग्राफरला केवढं महत्त्व होतं. पुढे रोल जाऊन डिजिटल फोटोग्राफी आली. रोल बनवणाऱ्या कंपन्या मागे पडल्या. मग मोबाईल आले. त्यात कॅमेरे आले. मग असे फोटोग्राफर घरी बसू लागले. मग अशात या फोटोग्राफर्सचं काय झालं असेल? काळानुसार बदलत जाणाऱ्या तंत्राशी जुळवून न घेतल्यानं अनेकांना घरी बसावं लागलं. जुळवून न घेता येणं ही एक बाब झाली. पण अलिकडे कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जी मशीनरी आली त्याने अनेक कारागिरांची परिस्थिती हालाखीची केली. अशाच एका विजय जोशीची ही गोष्ट आहे. लेथ मशीनवर अत्यंत सफाईदार काम करणाऱ्या जोशींच्या त्या कारखान्यात सीएनसी मशीन येतं. एक कारागिर जिथे दोन जॉब करत असे, तिथे मशीन 80 जॉब देऊ लागलं आणि जोशींची गरज संपते. इथून सिनेमा सुरु होतो.
मंगेश जोशी दिग्दर्शित या सिनेमाची खूप चर्चा झाली आहे. पुण्यापासून सिंगापूरपर्यंत वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये लेथ जोशी गाजला आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढते. हा सिनेमा फेस्टिवल ढंगाचा आहे हे खरं. म्हणजे, आपल्याला हवा तो वेग या सिनेमात नाही. तर सिनेमाच्या वेगाशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. ती तयारी असेल तर आपण हा सिनेमा पाहू शकतो. या सिनेमातून त्याला काय म्हणायचंय हे आपल्याला समजण्याची शक्यता निर्माण होते. हा सिनेमा आपल्याशी सतत बोलतो. त्याच्या फ्रेम्समधून आपल्याला काही तरी सांगत राहतो. लेथ जोशींसारखी बरीच मंडळी आपल्या आजूबाजूला असतात, त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व हा सिनेमा करतो. फेस्टिवर ढंगाचा असला तरी हा सिनेमा समजायला अवघड नाही. बरं लेथ जोशी हा एक मनुष्य वगळता बाकी मंडळी तुमच्या आमच्यासारखीच कमालीची चार्ज्ड आहेत. म्हणजे, जोशींची घरुन जेवण बनवून देणारी पत्नी, त्यांचा कॉम्प्युटर इंजिनीअर असलेला मुलगा यांचं बरंच चाललं आहे. काळाशी ते जुळवूनही घेताहेत. पण मुद्दा जोशींच्या फक्च कालबाह्य ठरण्याचा नाहीय, तर त्यांची त्यांच्या लेथ मशीनशी असलेल्या अटॅचमेंटचा आहे. म्हणूनच हीर-रांझा, लैला-मजून तसे लेथ-जोशी. पिक्चर बिक्चरमध्ये खुद्द दिग्दर्शकाने ही गोष्ट सांगितली हे विशेष.
या सिनेमात चित्तरंजन गिरी या अभिनेत्याने लेथ जोशी यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासह अश्विनी गिरी, ओम भूतकर, अजित अभ्यंकर आणि सेवा चौहान. या सर्वंच कलाकारांनी अफलातून अभिनय केला आहे. अत्यंत सहज आणि नैसर्गिक वाटावा असा हा अभिनय. आवर्जून उल्लेख करायला हवा तो सेवा चौहान यांचा. तर चित्तरंजन गिरी हे अमराठी असूनही अत्यंत संयत आणि सूक्ष्म असा त्यांनी लेथ जोशी साकारला आहे. अनेक फ्रेममध्ये त्यांना पाहताना गुरुदत्त यांचा भास होतो.
या चित्रपटाचं पार्श्वसंगीत, संकलन काबील ए तारीफा आहे. शिवाय, छायांकन. अर्थात त्यातही दिग्दर्शक दिसतो. अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींतून दिग्दर्शकाने नेमका अर्थ पोहोचवला आहे. काही चांगलं पाहण्याची इच्छा असेल तर हा सिनेमा आवर्जून पाहायला हवा. एक नक्की की त्या सिनेमाचा आपला असा वेग आहे. त्या वेगाशी जुळवून घेता यायला हवं. या सिनेमाला पिक्चर बिक्चरमध्ये आपण देतो आहोत, रेड हार्ट. कारण हा आपल्या जगण्याच्या खूप जवळ जाणारा सिनेमा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं, की आपल्यातल्या कोणाचाही येत्या काळात लेथ जोशी होऊच शकतो.
लेथ जोशी : मशीन-माणसाच्या प्रेमाची गोष्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2018 03:35 PM (IST)
अशाच एका विजय जोशीची ही गोष्ट आहे. लेथ मशीनवर अत्यंत सफाईदार काम करणाऱ्या जोशींच्या त्या कारखान्यात सीएनसी मशीन येतं. एक कारागिर जिथे दोन जॉब करत असे, तिथे मशीन 80 जॉब देऊ लागलं आणि जोशींची गरज संपते. इथून सिनेमा सुरु होतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -