'सैराट' प्रदर्शित झाला आणि महाराष्ट्रातून या चित्रपटावर कमालीच्या उड्या पडल्या. एकट्या महाराष्ट्राने या सिनेमाला तब्बल ८५ कोटींची कमाई करुन दिली. या चित्रपटाची लोकप्रियता लक्षात घेऊन करण जोहरने हुशारीने या सिनेमाचे हक्क आपल्याकडे घेतले. शशांक खेतान या दिग्दर्शकाच्या खांद्यावर 'सैराट'च्या रिमेकची जबाबदारी सोपवली. शशांकने यापूर्वी 'बद्रिनाथ की दुल्हनिया' हा सिनेमा दिल्यामुळे तो जोहरच्या खास मर्जीतला आहे. या सिनेमातून इशान खट्टर आणि जान्हवी कपूर सिनेसृष्टीत पदार्पण करते आहे. श्रीदेवीची मुलगी म्हणूनही जान्हवीकडे भारत डोळे लावून बसला आहे. पण तमाम मराठीजनांना मात्र 'धडक' या सिनेमाची उत्सुकता वेगळ्या कारणाने आहे. कारण तो आपला आणि आपल्या नागराजचा सिनेमा आहे. करण जोहर जेव्हा असा सिनेमा बनवायला घेतो तेव्हा नेमका करतो कसा, याकडे आपलं लक्ष आहे. तर सांगायची बात अशी की 'धडक' आणि 'सैराट' या दोन्ही सिनेमात आपला 'सैराट' अव्वल आहे. नागराजच्या दिग्दर्शनाची, बिटवीन द लाईन्सची, अभिनयाची, छायांकनाची सर 'धडक'ला नाही.


'सैराट' आणि 'धडक'ची तुलना होणं अपरिहार्य आहे. कारण खुद्द दिग्दर्शकानेच ती होऊ दिली आहे. या सिनेमातलं पिक्चरायझेशन असो किंवा गाणी असोत. 'धडक'ने नेहमीच 'सैराट'ची आठवण ठाशीव अशी करुन दिली आहे. म्हणून 'धडक' एकटा सिनेमा उभा राहत नाही. तो चकचकीत आहे. तांत्रिक मूल्यं उत्तम असलेला असा आहे. पण हे करुनही तो प्लास्टिक बनला आहे. जोहरचा सिनेमा असल्यामुळे आणि महाराष्ट्राच्या तुलनेत हिंदी सिनेमाचा पैसा भारतभर असल्यामुळे हा सिनेमा निदान शंभर कोटी कमवेल.

या सिनेमाची गोष्ट 'सैराट'सारखीच आहे. फक्त त्यात काही छोटेमोठे बदल करण्यात आले आहे. म्हणजे 'सैराट'मध्ये नायिकेचा बाप हा गावचा पाटील आहे. तर इथे तो उदयपूरसारख्या शहरातला राजकीय नेता दाखवला आहे. परशा हा विद्यार्थी आणि अत्यंत गरीब स्थितीला दाखवला आहे. तर इकडे मधू गाईड असून सधन आहे. सिनेमातल्या संवादांमधून मधू खालच्या समाजाचा आणि पार्थवी (नायिका) वरच्या समाजाची आहे ते लक्षात येतं. तर असे जीव एकमेकांवर प्रेम करु लागतात. पण नायिकेच्या बापाला ते मान्य नाही. मग पार्थवी मधूला घेऊन पळून जाते. पुढं त्यांचं काय होतं. ते कुठे राहतात. अशी गोष्ट पुढे जाते.

गोष्टीत साधर्म्य असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की 'सैराट' बनवताना नागराजने ऑनर किलिंगवर भाष्य करणारा होता. म्हणूनच नागराजच्या सिनेमातून सामाजिक तेढ, ग्रामीण भागात असलेली समाजव्यवस्था आधी दिसते. त्यातून सिनेमा फुलतो आणि प्रसंगांमधून तो एकेक ओरखडे मारत राहतो. 'धडक'मध्ये नाही म्हणायला शेवटी ऑनर किलिंगची पाटी येते. पण सिनेमाभर दिसत राहतो तो फक्त राजकीय सूडाचा पट. 'सैराट'च्या सकस कथेला साथ दिली होती ती उत्तम अभिनयाने आणि छायांकनाने. 'धडक'मध्ये इशान खट्टर भाव खाऊन जातो. जान्हवीही कधीमधी आवडू लागते. पण पार्थवीमधला खानदानी माज तिच्यात नाही. कमकुवत आवाज आणि प्लास्टिक भाव यामुळे जान्हवी मनाची पकड घेत नाही आणि आपल्याला दिसत राहते आर्ची. बुलेटवरुन अॅटिट्यूड घेऊन फिरणारी.. पोरांना विहिरीतून हुसकावणारी.. सगळं गाव खिशात घालून फिरणारी.. हे सगळं सुरु असताना आपला त्या त्या वयाचा इनोसन्स जपणारी आर्ची. हे संपूर्ण श्रेय नागराजचं आहे. 'सैराट'मधला रॉनेस 'धडक'मध्ये अजिबात नाही. तो चकचकीत शहरीकरणात न्हाऊन निघाला आहे.

अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली गाणी श्रवणीय आहेत. झिंगाट गाण्याची लोकप्रियता कॅश करण्यासाठी ते गाणं हिंदी करुन या सिनेमात घातलं गेलं आहे. पण ते सिनेमात जात नाही. कथानक उदयपूरमध्ये घडतं. त्याला राजस्थानी राहणीमानाची, भाषेची पार्श्वभूमी असताना अस्सल मराठी तालाचं गाणं तिथे जात नाही. तो पॅच वाटत राहतो. 'धडक'चा टायटल ट्रॅक आणि मैं वारा.. हे नवं गाणं ऐकायला छान वाटतं. मैं वारा.. हे गाणं उत्तरार्धात येतं. याच गाण्यात दिग्दर्शकाने मधू आणि पार्थवीचं लग्न आणि बाळंतपण आटोपलं आहे. त्यामुळे 'सैराट'पेक्षा 'धडक' लहान आहे. शिवाय, तो रेंगाळत नाही. आर्ची-परशापेक्षा मधू-पार्थवीची पळून गेल्यानंतरची स्थिती फारच बरी आहे. सिनेमा घडत जातो आणि आपण तो पाहत राहतो. पण 'धडक' कुठेही पिळवटून टाकत नाही. खदखदून हसवत नाही. डोळ्यांचं पारणं फेडत नाही. हिंदीच्या स्मार्टनेस आणि एकूणच बॉलिवूडचा अॅटिट्यूड या सिनेमाला चिकटलेला जाणवतो.

इशान, जान्हवीसह या सिनेमा आशुतोष राणा, ऐश्वर्या नारकर यांच्याही भूमिका आहे. या सिनेमात कामं सगळ्यांनीच नेटकी केली आहेत. पण, सिनेमा म्हणून यात असलेलं स्टेटमेंट आणखी जोरकस असायला हवं होतं असं वाटत राहतं.

एकूणात, 'सैराट'चे चाहते असाल तर 'धडक' निराशा करतो. आणखी या सिनेमात काहीतरी हवं होतं असं वाटत राहतं. नाही म्हणायला हा सिनेमा बिझनेस करेल, पण हा सिनेमा मराठी जनतेचा ठाव घेण्यात काहीसा अपयशी ठरला आहे हे नक्की. म्हणूनच 'पिक्चर बिक्चर'मध्ये या सिनेमाला मिळतो आहे ओके-ओके इमोजी. हा एक अॅव्हरेज चित्रपट आहे, असं म्हणायला हरकत नाही.