या फोटोत सोनालीने लहान केस केल्याचं स्पष्ट दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनालीने मुलाला तिच्या आजाराबद्दल सांगतानाच्या भावना मांडल्या आहेत. त्यात सोनालीने तिच्या मुलाने कॅन्सरची गोष्ट कशी पचवली आणि आता तो तिची कशी काळजी घेतोय, हे मांडलं आहे.
सोनालीने पत्रात काय म्हटलंय?
“12 वर्ष, 11 महिने आणि 8 दिवसांपूर्वी जन्माला आलेला माझा मुलगा रणवीर बेहल यांनं जन्मताच माझ्या हृदयाचा ताबा मिळवला. तो जन्मल्यापासून त्याचा आनंद आणि समाधान हे माझ्या आणि पती गोल्डी बेहलच्या आयुष्याचं लक्ष्य राहिलं. त्यामुळे जेव्हा सी (कॅन्सर) सारख्या रोगानं माझ्या शरिरात डोकं वर काढलं, तेव्हा त्याला कसं सांगायचं या संभ्रमावस्थेत होतो. परंतु आम्हाला जसं त्याला सुरक्षित ठेवायचंय, तसंच आम्हाला त्याला संपूर्ण सत्यही सांगायचं होतं. आम्ही नेहमीच त्याच्याशी मोकळेपणानं आणि खरं बोललोय, त्यामुळे यावेळीही काही वेगळं होणार नव्हतं. कॅन्सरबाबत सांगितल्यानंतर त्यानं ते खूप समजूतदारपद्धतीनं घेतलं आणि लगेचच तो माझ्या ताकदीचा आणि सकारात्मकतेचा महत्वाचा स्त्रोत झाला. काही वेळातर त्यानं माझ्या पालकत्वाची भूमिका घेतली आणि मला काय करणं गरजेचं आहे, त्याची आठवण करुन दिली. मला वाटतं मुलं असणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.”