पतंग आणि आपलं नात तसं जुनं आहे. घराच्या गच्चीवरून पतंग उडवला नाही, असा मुलगा सापडणं कठीण. नेमका हाच धागा पकडून दिग्दर्शक सुनिकेत गांधी यांनी फिरकी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पतंग मध्यवर्ती ठेवून त्यांनी ही गोष्ट निवडली आहे खरी. पण त्यासाठी दिग्दर्शक म्हणून असावी लागणारी माध्यमावरची पकड, कलाकारांच्या अभिनयावर दिसणारा दिग्दर्शकीय ठसा यांचा अभाव जाणवतो.


सुनिकेत यांचा हा पहिला चित्रपट आहे. त्यामुळेच त्यांच्या नवखेपणाची झाक या सिनेमात दिसते. त्यांचा चित्रपट बनवण्याचा हेतू जरी प्रामाणिक असला, तरी एखादी गोष्ट नेमकेपणाने पोहोचवण्यासाठी काही गोष्टीचा मोह टाळावा लागतो. तो न टाळल्याचा फटका या सिनेमाला  बसला आहे. या चित्रपटाची लांबी मोठी झाल्याने चित्रपट रखडतो. कंटाळवाणा होतो.

ही गोष्ट तीन मित्रांची आहे. त्या तिघांचा गोविंद म्होरक्या. शाळेत शिकून उनाडक्या करणं. पतंग उडवणं हे त्यांचं मुख्य काम. तिघेही एकाच वर्गात शिकतात. या वर्गात रघू नावाचा एक दांडगट मुलगाही शिकतो. वर्गातल्या मुलांवर दादागिरी करणं, धमक्या देणं हे त्याचं काम. गोविंद काही रघूच्या वाट्याला जात नाही. पण शाळेत एक प्रकार घडतो आणि रघू आणि गोविंदची थेट ठसन सुरू होते. या दोघांमधला एक कॉमन फॅक्टर असा की, दोघेही पतंग उडवण्यात माहीर आहे. मग त्यांची ही भांडणं पुढे कशी वळण घेतात, त्यावर फिरकी हा सिनेमा बेतला आहे.

मुळात सिनेमाच्या कथेचा जीव खूप छोटा आहे. याच विषयावर तीसेक मिनिटांची शॉर्टफिल्म होऊ शकते. त्याचा दोन तासांचा सिनेमा झाल्यामुळे त्यात अनेक प्रसंग घालावे लागले आहेत. मग विनाकारण हा सिनेमा लांबतो आणि कंटाळवाणा होतो. छायांकनाच्या पातळीवर याच काम चांगलं झालं आहे. दिग्दर्शकाचा प्रयत्न प्रामाणिक असला, तरी कोणत्या गोष्टी घ्याव्यात आणि कोणत्या टाळाव्यात यात त्याचा किंचित गोंधळ उडालेला दिसतो. या चित्रपटात पार्थ भालेराव, पुष्कर लोणारकर, अथर्व उपासनी या मुलांच्या भूमिका आहेत. या मुलांचा अभिनय आपण यापूर्वीच्या चित्रपटात पाहिला आहे. त्यामुळे यात नाविन्य उरत नाही. अश्विनी गिरी, हृषिकेश जोशी यांच्या भूमिका छोट्या पण नेटक्या. संगीताबाबतही यातली गाणी पाश्चात्य बनावटीची असल्यामुळे आधी निम्मावेळ त्यातलं गीत शोधण्यात जातो. पण त्याचा अर्थ काही केल्या लागत नाही.

एकूणात, दिग्दर्शकाचा हा पहिला प्रयत्न आहे. हा प्रयत्न प्रामाणिक असला, तरी तो पुरेसा नाही. अभिनय, संगीत, संकलन, लेखन आदी पातळीवर या चित्रपटाचा रंग आणखी ठाशीव होण्यासाठी या फिरकीवर आणखी काम करण्याची गरज वाटत राहते. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळतात ओके-ओके इमोजी.