मुंबई : सोशल मीडियावर कोट्यवधी लोकांना आपल्या डोळ्यांनी घायाळ करणारी मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरला ओळखत नाही, असं कोणीही नाही. एका छोट्याशा व्हिडीओ क्लिपमुळे रातोरात लोकप्रियता मिळवणं आणि एक महिन्याच्या आत 50 लाखांपेक्षा इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणं साधी-सोपी गोष्ट नाही. पण याच इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रिया केवढी मोठी रक्कम कमावते, हे तुम्हाला माहित आहे का?
नुकतंच प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक मोठमोठ्या ब्रॅण्डचं प्रमोशन सुरु केलं आहे. एखाद्या ब्रॅण्डची एक पोस्ट करण्यासाठी प्रियाला आठ लाख रुपये मिळतात, अशी माहिती आहे. इतकंच नाही तर अनेक मोठे ब्रॅण्ड्स प्रमोशनसाठी प्रियाकडे विचारणा करत आहेत. सोशल मीडियाद्वारे कमाई करणाऱ्या बऱ्याच सेलिब्रिटींना प्रियाने मागे टाकलं आहे.
प्रियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. इन्स्टाग्रामवर प्रियाच्या फॉलोअर्सच्या संख्येने 51 लाखांचा आकडाही पार केला आहे. यासोबतच कमी वेळेत फॉलोअर्सच्या संख्येत वाढ होणाऱ्या जगातील मोजक्या सेलिब्रिटींच्या यादीत प्रियाचा समावेश झाला आहे.
प्रिया प्रकाश मल्याळी चित्रपट 'ओरु अडार लव्ह' या सिनमातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणार आहे. हा चित्रपट जून 2018 मध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा सिनेमा 3 मार्च, 2018 रोजी प्रदर्शित होणार होता. व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिपही याच सिनेमातील आहे. 'ओरु अडार लव्ह' चं दिग्दर्शन ओमार लुलूने केलं आहे. हा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा असून हायस्कूल रोमॅन्सवर आधारित आहे.