गेल्या काही महिन्यांपासून हिंदी सिनेमामध्ये खूप नवनवे विषय येताना दिसू लागले आहेत. अगदीच तोंडावर असलेल्या सिनेमांची नावं द्यायची तर अंधाधुन, तुंबाड, बधाई हो, स्त्री अशा सिनेमांची नावं वानगीदाखल देता येतील. वेगळे विषय घेऊन त्याची उत्तम मांडणी करून बाॅक्स आॅफिसवर हमखास नफा कमवला जातोय. नफा होताना दिसतो कारण भारतीय सिनेप्रेमींना असे विषय पाहायला आवडतायत. याच माळेत आणखी एका नव्या सिनेमाची भर पडली आहे. त्याचं नाव आहे, बाजार. गौरव चावला याची ही पहिलीच फिल्म. ती निवडताना त्याने मुंबई स्टाॅक एक्स्चेंजची पार्श्वभूमी निवडली. तिथला व्यापार, तो बाजार आणि या आर्थिक घडामोडीमध्ये पैशावरून मांडले जाणारे डाव, प्रतिडाव याचं चित्रण या सिनेमातून करण्याचा प्रयत्न दिसतो. सैफ अली खान याचा अभिनय ही आणखी एक सिनेमाची जमेची बाजू. नवा विषय आणि कलाकारांचा नेटका अभिनय यामुळे हा चित्रपट खिळवून ठेवतो. पण जाता जाता याचा शेवट आणखी रंजक असता तर आणखी मजा आली असती असंही हा चित्रपट पाहताना वाटून जात.
उत्तर भारतातल्या एका छोट्या गावात राहणारा रिझवान स्टाॅक ब्रोकर आहे. स्मार्टनेस आणि हुशारी ठासून भरलेल्या रिझवानला मोठं व्हायचंय. खूप पैसे कमवायचेत. स्टाॅक एक्स्चेंजचं हुकमी पान असलेल्या शकुन कोठारीसारखा त्याला मोठं व्हायचंय. तो त्याचा आदर्श. आपलं नशीब आजमावण्यासाठी रिझवान मुंबईत येतो. शकुनकडे काम करायला मिळावं म्हणून धडपडतो. त्याची धडपड पुढे त्याला कुठे नेते.. स्टाॅक एक्स्चेंजमध्ये चालणारे व्यवहार, तिथले ताण.. राजकारण हे जवळून पाहताना त्याचं पुढे काय होतं, या सगळ्याचं चित्रण या बाजारमध्ये मांडलेलं दिसतं.

या सिनेमाची बांधणी करताना नाट्यकलेची कास दिग्दर्शकाने पकडली आहे. नाटकात कसा नायकच भूमिकेतून बाहेर येत, सूत्रसंचालकाची भूमिका बजावतो आणि गोष्ट पुढे नेतो, तशाप्रकारे यातही रिझवान आवश्यक असेल तेव्हा, भूमिकेतून बाहेर येत प्रेक्षकांशी संवाद साधतो. निखिल आडवानी याचं लेखन ही या सिनेमातली जमेची बाजू. शिवाय यातले संवाद. लोकांना समजतील असे तरीही टाळ्यावसूल असा संवादांचा भरणा आहे सिनेमात. तांत्रिक अंगांबद्दल आवश्यक ती सर्व काळजी या सिनेमात घेतली गेलेली दिसते. संगीताबद्दल याचं पार्श्वसंगीत नेटकं झालं आहे. गाण्यांबद्दल मात्र ही गाणी ओठांवर रूळत नाहीत. पटकथेमध्ये यातली काही गाणी आल्यामुळे गोष्टीचा ताण काहीसा हलका होतो. तरीही सिनेमा झाल्यानंतर ही गाणी लक्षात राहात नाही. त्यातल्या त्यात केम छो मजामा.. हे गाणं बरं आहे.

सैफ अलीचा अभिनय हा या सिनेमाचा हुकमी एक्का आहे. शकुन कोठारी साकारताना, त्याने त्याचा डौल आणि त्याचं अत्यंत व्यवहारी असणं याचा समतोल साधत भूमिका वठवली आहे. अनेक प्रसंगांमध्ये सैफ भाव खाऊन जातो. या चित्रपटातून विनोद मेहरा यांचा मुलगा रोहन मेहरा सिनेसृष्टीत पदार्पण करतो आहे. येत्या काळात त्याच्याकडून आणखी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. यासोबत चित्रांगदा सिंग, राधिका आपटे यांच्याही भूमिका आहेत, पण त्या नावापुरत्या. चित्रांगदा या सिनेमात दिसलीय छान. राधिकाचं या सिनेमात असणं केवळ प्रणयदृश्यांपूरतं आहे की काय असं वाटण्याला इथे वाव आहे.

या सिनेमता खटकणारी गोष्ट म्हणजे, तिचा शेवट. सिनेमा बराचवेळ जो ताण निर्माण करून ठेवतो तो शेवटी फारच मिळमिळीत पद्धतीने सुटतो. त्यात आणखी काहीतरी हवं असं वाटत राहतं. एकूणात नवा विषय, नवा दिग्दर्शक आणि सैफचा अभिनय. पिक्चर-बिक्चरमध्ये या सिनेमाला आपण देतो आहोत, ३ स्टार्स. सैफसाठी आणि त्यातल्या फाडू संवादांसाठी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहायला हरकत नाही.