Payal Kapadia FTII : आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes 2024) भारताची विजयी पताका फडकवणारी दिग्दर्शिका पायल कपाडिया (Payal Kapadia) सध्या चर्चेत आहे. कान्स महोत्सवात पायलच्या चित्रपटाने प्रतिष्ठेचा ग्रँड प्रिक्स पुरस्कारावर आपली मोहोर उठवली आहे. 'ऑल वी इमेजिन एज लाइट' (All We Imagine as Light) या चित्रपटाने पुरस्कार जिंकल्यानंतर देशभरातून पायल कपाडिया आणि चित्रपटाच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ऑस्कर विजेता कलाकार रसुल पोकुट्टी याने आता पायल आणि इतर विरोधातील खटला मागे घेण्याची आवाहन FTII ला केले आहे.
पायल कपाडियाने हिने 'फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'(FTII) या प्रख्यात संस्थेतून चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले आहे. या दरम्याने पायल कपाडिया आणि इतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाविरोधात एफटीआयआय संस्थेने दाखल केलेल्या तक्रारीवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
रसूल पुकुट्टी यांनी काय म्हटले?
ऑस्कर विजेते साउंड डिझाइनर रसूल पुकुट्टी हे देखील एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी कान्समध्ये विजयी ठरलेल्या पायल कपाडिया आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रसूल पुकुट्टी यांनी पोस्ट करत म्हटले की, आतातरी एफटीआयआयने पायल आणि इतर विद्यार्थ्यांविरोधत दाखल केलेले खटले मागे घेतले पाहिजे.
काय आहे प्रकरण?
2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आल्यानंतर 2015 मध्ये एफटीआयआयच्या संचालकपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली. गजेंद्र चौहान यांची नियुक्ती ही राजकीय असून त्यांचा विद्यार्थ्यांना कोणताही फायदा होणार नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. चौहान यांच्या नियुक्तीवरून एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल 139 दिवस आंदोलन केले होते. या आंदोलनाला सिनेसृष्टीतील कलाकारांनी आपला पाठिंबा व्यक्त केला होता.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना ट्रोलिंग, अपशब्दाच्या भडिमाराला सामोरे जावे लागले. पायल कपाडियासह आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना देशविरोधी असल्याचा संबोधण्यात आले. काहींना तर पाकिस्तानतही जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.