आता लस्सी बनवणे अगदी सोप्पे.

500 ग्रॅम दही घ्या. त्यात 200 ग्रॅम साखर घाला.

मिश्रण एका बंद बाटलीत ठेवा. आणि ती बाटली कोणत्याही गाडीत कशीही ठेवा.

मुंबईतल्या कोणत्याही रस्त्यावर तीन किलोमीटर्स फिरुन या.

लस्सी तयार. लस्सी प्या आणि थकवा घालवा.

हा मेसेज फेसबुकवर पडला आणि हास्याची एकच खसखस नेटकऱ्यांमध्ये उमटली. मुंबईतले खड्डे यांवर आता खूप बोललं गेलं आहे. अनेकदा नाराजी नोंदवून झाली आहे. पण त्यातून प्रशासनाला काही जाग येत नाही असं दिसतंय. आता हे खड्डे आपल्या पाचवीला पूजले आहेत, असं समजून आता यातून आपण आनंद घ्यायला हवा असं लोकांना वाटू लागलं आहे. या लस्सीच्या जन्म झाला तो अशाच उपहासातून. मग एबीपी माझाने ही लस्सी थेट तयार करायची ठरवली. त्यासाठी त्यांनी सोबत घेतलं अभिनेता पुष्कर श्रोत्रीला.

लस्सीची ही सफर सुरु झाली पुष्कर श्रोत्रीच्या घरापासून. एका बाटलीत दही आणि साखर घालून पुष्करच्या साक्षीने हा प्रवास सुरु झाला. अनेक गोष्टींवर यावेळी चर्चा झाली. खड्ड्यांचा वापर करून जर लस्सी बनवणं शक्य असेल तर आणखी काय काय करता येईल याचा विचारही यावेळी मांडला गेला. एक नक्की हा सगळा अतिशयोक्ती अलंकाराचा मुक्तहस्त वापर होता. पण क्रिएटिव्हीटीला वेळेची, स्थळ-काळाची मर्यादा नसते असं म्हणतात नं.. तसं झालं. या गप्पांतून आलेल्या काही क्रिएटिव्ह गोष्टी अशा पुष्करने यावेळी सांगितलं की लस्सीप्रमाणे आलं लसूण पेस्ट, शेंगदाणा कूट आदी गोष्टीही बनवता येतील.

या प्रवासात त्याला विचारलं गेलं की तुला सगळ्यात नैराश्यजनक प्रवास कोणता वाटतो, तार यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून थक्क व्हाल. तो म्हणाला, सरळ, सपाट रस्ता आला आणि माझी गाडी गिअर बदलत पाचव्या गिअरवर गेली की मला नैराश्य येतं आणि वाटतं आपण कुठे आलो आहोत. त्याचवेळी गाडी चालवण्याचा आनंद कसा लुटतोस यावर जितक्या जास्त मोठ्या खड्ड्यातून आपण जातो ते आनंदाचा क्षण असं उत्तर त्याने दिलं.



यासह इतर अनेक विषयांवर गप्पा झाल्या. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. एक नक्की, की अशी लस्सी बनवणं खरं कुणाला आवडणारं नाही. पण नाईलाजाने आता असे उपहासाचे मार्ग शोधून काढले जात आहेत. कारण रोज मरे त्याला कोण रडे. यातून प्रशासनाने बोध घ्यावा. लोकांना किमान चांगल्या सुविधा द्याव्यात अशी अपेक्षा एबीपी माझाच्या माध्यमातून पुष्करने प्रशासनाला केली.