मुंबई : मुंबई मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील वृक्षतोडीला अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अप्रत्यक्ष समर्थन केल्यानंतर मनसेने कडाडून विरोध केला आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी कार्टून काढून, 2009 मध्ये मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन नवीन सरकार आल्यावर मेट्रोला कसे पाठिंबा देत आहेत, असा सवाल विचारला आहे. तसंच जंगल तोडून घरात झाड लावल्याने जंगल तयार होत नाही, असंही म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत.


मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडांच्या कत्तलीला परवानगी मिळाली आहे. परंतु सामान्य नागरिक, अनेक पर्यावरण प्रेमी, राजकारणी आणि सेलिब्रिटींनी या निर्णयाचा विरोध केला आहे. रस्त्यावर उतरुन आंदोलनं सुरु आहेत. त्यातच या वादात आता अमिताभ बच्चन यांनी उडी घेतली आहे. अमिताभ बच्चन यांनी मेट्रोच्या समर्थनार्थ ट्वीट करुन कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला अप्रत्यक्षरित्या समर्थन केलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "माझ्या आजारी मित्राने रुग्णालयात जाण्यासाठी गाडीऐवजी मेट्रोचा वापर केला म्हणून तो लवकर पोहोचला. परत आला तेव्हा फारच प्रभावित झाला होता. म्हणाला अतिशय वेगवान, सोयीस्कर आणि सर्वात कार्यक्षम प्रवास. प्रदूषणावर उपाय. जास्त झाडे लावा. मी माझ्या गार्डनमध्ये लावली आहेत, तुम्ही."

याचा मनसे नेते अखिल चित्रे यांनी कार्टूनच्या माध्यमातून तीव्र विरोध केला आहे. "2009 ला जुहूला मेट्रो होणार होती, त्यावेळी विरोध करणारे अमिताभ बच्चन नवीन सरकार आल्यावर मेट्रोला कसे पाठिंबा देत आहेत? असा सवाल विचारला आहे. तसंच जंगल तोडून घरात झाड लावल्याने जंगल तयार होत नाही, असंही म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या दुतोंडी भूमिकेचा विरोध करण्यासाठी हे कार्टून बनवल्याचं चित्रे यांनी सांगितलं.

दरम्यान याआधीच शिवसेनेने आरेमधील कारशेडला विरोध केला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांची पुत्र अमित ठाकरे यांनी कारशेडच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

आरेतील कारशेडसाठी वृक्षतोड 30 सप्टेंबरपर्यंत होणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही