मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी खास गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित 'मन बैरागी' या विशेष चित्रपटाचा फर्स्ट लूक आज (17 सप्टेंबर) जारी करण्यात आला. नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस आहे.


नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील न पाहिलेले, ऐकलेले प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. संजय लीला भन्साली आणि महावीर जैन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक संजय त्रिपाठी आहेत. विशेष म्हणजे सिनेमाच्या फर्स्ट लूक पोस्टर सुपरस्टार प्रभासने इन्स्टाग्रावर शेअर केला आहे.


कोणत्याही यशस्वी माणसाच्या आयुष्यात असा टप्पा येतो, जेव्हा तो या यशाच्या दिशेने पाऊल टाकतो आणि 'मन बैरागी'मध्ये हेच दिसणार आहे, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.

संजय लीला भन्साली सिनेमाबाबत सांगतात की, "ही न ऐकलेली कहाणी आहे, जी सांगायला हवी. यामधील आवाहन आणि संदेश हे कहाणीचं वैशिष्ट्य आहे." "हा चित्रपट प्रेक्षकांच्या काळजाला हात घालेल. माझ्यासाठी ही अशा माणसाची कहाणी आहे, जो स्वत:चा शोध घेण्यासाठी निघाला होता आणि मग आपल्या देशाचा सर्वात मोठा नेता बनला," असं चित्रपटाचे दिग्दर्शक संजय त्रिपाठी यांनी म्हटलं.

वाढदिवसानिमित्त मोदी गुजरातमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजा 69 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने मोदी गुजरातमध्ये पोहोचले आहे. इथे त्यांनी सरदार सरोवराला भेट दिली. मोदींच्या स्वागतासाठी सरदार सरोवरात तिरंगी रंगाची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त नर्मदा जिल्ह्यातील केवडियामध्ये नमामी देवी नर्मदे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदी आज आईची भेट घेण्याची शक्यता आहे.