मुंबई : धुमधडाका फेम अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांना आता ‘अ’ श्रेणीनुसार मानधन देण्यात येणार आहे. माझाने शनिवारी अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांची व्यथा मांडली होती. त्यानंतर राणे यांच्या प्रस्तावाचा फेरआढावा घेत त्यांना अ श्रेणीचं मानधन देण्यात येणार आहे.


कलाकार आणि साहित्यिकांसाठी सरकार मानधन देतं. अ श्रेणीसाठी पात्र असूनही त्यांना मार्च 2015 पासून क श्रेणीचं 1500 रुपयांचं मानधन देण्यात येत होतं. त्यामुळे ऐश्वर्या राणे यांना अ श्रेणीनुसार 2100 रुपये मानधन मिळणार आहे.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत हे  मानधन दरमहा कलाकार, साहित्यिकांना देण्यात येतं. यासाठी राज्य सरकारची विशेष समिती पात्र कलाकार आणि साहित्यिकांची निवड करते.

कोण आहेत ऐश्वर्या राणे?

“सुरेखा’ उर्फ ऐश्वर्या राणे यांनी अशोक सराफ यांच्या समवेत धुमधडाका, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या समवेत ‘भटक भवानी’ या चित्रपटात त्यांनी मुख्य नायिका म्हणून काम केलं आहे. तसेच शराबी, नमक हलाल यासारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन, परबीन बाबी, निळू फुले, जयश्री गडकर यासारख्या दिग्गज कलाकारांसमवेत त्यांनी सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे.

दुर्दैवाने त्यांची कारकीर्द ऐन बहरात असताना अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घोड्यावरुन पडून त्यांचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पाठीचं हाड मोडल्याने कारकिर्दीला ब्रेक लागला. उपचारासाठी त्यांना मुंबईतील त्यांची सर्व संपत्ती विकावी लागली. पुढे हाती काम न राहिल्याने आणि नातेवाईकांनीही पाठ फिरविल्याने नियतीने त्यांच्यावर हालाखीची परिस्थिती आणली आहे.