मुंबई : जानेवारी महिना बॉलिवूड सेलिब्रेटींच्या साखरपुड्याचा महिना आहे, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. गेल्या महिन्यात विरानुष्काच्या लग्नाची लगबग संपते, तोच दीपिका-रणवीर एंगेजमेंट करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला. त्यातच प्रसिद्ध अभिनेता प्रतीक बब्बरही साखरपुडा करण्याची शक्यता आहे.


22 जानेवारीला लखनौमध्ये प्रतीक आणि त्याची गर्लफ्रेण्ड सान्या सागर यांची एंगेजमेंट होणार असल्याचं वृत्त आहे. 31 वर्षांचा प्रतीक हा प्रख्यात अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे.

'पाठकबाई' अक्षया आणि सुयश टिळकचा साखरपुडा?


8 वर्षांपासून प्रतीक आणि सान्या एकमेकांना ओळखतात, मात्र गेल्याच वर्षी ते रिलेशनशीपमध्ये अडकले. प्रतीक किंवा त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप साखरपुड्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. साखरपुड्याची तारीख पुढे-मागे होण्याची शक्यता आहे. दोघांचे कुटुंबीय, मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

प्रतीक बब्बरने 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून 2008 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तो एक दिवाना था, धोबीघाट यासारख्या चित्रपटांमध्ये झळकला. बागी 2 चित्रपटातून तीन वर्षांनी तो पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अहमद खान यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात तो खलनायकाच्या व्यक्तिरेखेत आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा 5 जानेवारीला साखरपुडा?


सान्याचा जन्म 1 मे 1990 रोजी लखनौमध्ये झाल्याची माहिती आहे. फॅशन कम्युनिकेशन या विषयात तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतून पदवी घेतली. सध्या ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करते.