सागर छाया वंजारी हा नवा दिग्दर्शक 'रेडू' या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. त्याच्या या सिनेमाला राज्य सरकारचे पुरस्कार मिळाल्यामुळे या सिनेमाबद्दल उत्सुकता आहेच. शिवाय दिग्दर्शक म्हणून त्यालाही प्रतिष्ठेचा अरविंदम पुरस्कार मिळाला आहे. अशा दिग्दर्शकाचा नवा सिनेमा पाहणं हे कुतूहलाचं नसतं तरच नवल. या सिनेमाचा विषय, त्याची मांडणी त्यासाठी त्याने निवडलेले कलाकार आदी पाहता अत्यंत विचारपूर्वक त्याने या सिनेमाची मांडणी केली आहे हे लक्षात येतं.


रेडू ही अत्यंत साधी सोपी गोष्ट आहे. या सिनेमातला काळ आहे, १९७० सालचा. म्हणजे, त्याकाळी टीव्ही तर नव्हतेच. पण नुकतेच बाजारात आले होते ते रेडिओ. महानगरांमध्ये रेडिओ लोकांना माहित होते, पण कोकणातल्या छोट्या छोट्या गावांत रेडिओबद्दल कमालीचं कुतूहल होतं. ते कुतूहल पकडून दिग्दर्शकाने गोष्ट गुंफली आहे.

ही गोष्ट तातूची आहे. तातू आपल्या त्रिकोणी कुटुंबात खुश आहे. रोजंदारीवर काम करुन तो कुटुंबाचं पोट भरतो. त्याची पत्नी छायाही त्याला मदत करते. परिस्थिती फार बरी नसली तरी त्याचं रडं नाही. अशावेळी तातूकडे मुंबईचे पाहुणे येतात. त्यांनी आणलेला असतो रेडिओ. यानिमित्ताने गावात रेडिओ येतो आणि तातूची कॉलर ताठ होते. पुढे या रेडिओचा प्रवास कसा होतो, त्या रेडिओचं पुढे काय होतं हे सगळं या सिनेमातून मांडण्यात आलं आहे.

छोटी गोष्ट घेऊन त्यात शक्यतो डिटेलिंग करण्याकडे या दिग्दर्शकाचा कल आहे. तातूची भाषा, त्याची देहबोली, त्याचे कुटुंबियांशी असलेले संबंध, गावाशी त्याची असलेली नाळ, त्याच्या गरजा हे सगळं अत्यंत नेटकेपणाने त्याने मांडलं आहे. त्यासाठी त्याला उपयोग झाला आहे तो छायांकनाचा. कोकणातलं सौंदर्य या कॅमेऱ्याने टिपलं आहेच. शिवाय, कलाकारांचे हावभाव  टिपण्यातही या छायांकनाने बाजी मारली आहे. ही गोष्ट केवळ तातू आणि रेडिओपुरती मर्यादित नाही. तर ती त्यापलिकडे माणसांच्या स्वभावावर, माणूसकीवर भाष्य करते. म्हणून हा सिनेमा केवळ रंजन करत नाही तर जाता जाता आपण माणूसपणाबद्दल अभिमान वाटावा असं काहीतरी देऊन जातो. पटकथाकाराचं हे यश आहे असं म्हणावं लागेल.

शशांक शेंडे यांना आपण आजवर अनेक सिनेमांमधून पाहिलं आहे. अनेकदा त्यांचा ग्रामीण बाज आपण पाहिला. पण 'रेडू' पाहिल्याानंतर मात्र त्यांच्यातल्या कलाकाराची कुवत दिसते. त्यांच्यासह छाया कदम यांचा अभिनयही लक्षात राहण्याजोगा. हा सिनेमा कोकणात घडतो. त्यामुळे त्या भाषेचा लहेजा कोकणी ठेवण्यासाठी दिग्दर्शकाने विशेष मेहनत घेतली आहे. सर्वच लहान सहान कलाकारांनीही भूमिकेची गरज ओळखून आपलं योगदान दिलं आहे.

केवळ गोष्ट न मांडता, त्या गोष्टी पलिकडे जाण्याचा दिग्दर्शकाचा ध्यास कौतुकास्पद आहे. समजायला अत्यंत सोपा, सहज असा हा सिनेमा आहे. तो आपण पाहायला हवा. या सिनेमाला पिक्चर बिक्चरमध्ये मिळाला आहे रेड हार्ट.