मुंबई : 'गुंडे' चित्रपटात चोरीची बाईक वापरल्यामुळे अभिनेता रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिस दोघांना नोटीस पाठवून चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे.


मुंबई गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी चोरीच्या बाईक्स मॉडिफाय करुन कमी किमतीत विकणाऱ्या एका गँगचा पर्दाफाश केला होता.
आरिफ खान, आसिफ खान, साहिल गांजा आणि मिलिंद सावंत या चौघांना अटक केली होती.

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या गुंडे चित्रपटाच्या शूटिंगसाठी वापरलेली बाईक चोरीची असल्याचा आरोप आहे. टोळीच्या सदस्यांनी तिला मॉडर्न लूक दिला होता.

लाखो रुपये किमतीच्या बाईक चोरुन तिला टोळीतील सदस्य मॉडिफाय करुन घेत. त्यानंतर ही गँग 25 ते 30 हजार रुपयांना बाईकची विक्री करायची.

बाईकप्रेमींपासून चित्रपट, जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी निर्माते या चोरीच्या बाईक्स कमी किमतीत खरेदी करत. गुंडे सिनेमासाठी हीच चोरीची बाईक वापरल्याचा आरोप आहे.

मुंबई क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करत आहे. रणवीर किंवा अर्जुनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.