मुंबई : 'मसान'फेम अभिनेत्री श्वेता त्रिपाठी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेता आणि रॅपर चैतन्या शर्मासोबत ती 29 जूनला लग्नगाठ बांधणार आहे. चैतन्य श्वेतापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे.


मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत गोव्यात श्वेता-चैतन्य लग्न करणार आहेत. दिल्लीत एका नाटकाच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली होती.

चैतन्यने अत्यंत रोमँटिक पद्धतीने श्वेताला लग्नाची मागणी घातली होती. आपलं नवीन नाटक येत असल्याचं सांगून त्याने श्वेताला मुंबईतील ककू क्लबमध्ये बोलावलं. मात्र त्यावेळी स्टेजवरच चैतन्यने श्वेताला प्रपोज केलं होतं.

32 वर्षांची श्वेता दिल्लीचे माजी मुख्य सचिव पीके त्रिपाठी यांची कन्या आहे. तिने मसान, हरामखोर यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. मसानमधील शालूची व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती. ती 'क्या मस्त है लाईफ' या मालिकेतही झळकली होती.

रॅपर चैतन्य शर्मा 'स्लो चिता' या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचं हायजॅक चित्रपटातील 'क्रिपया ध्यान दे' हे गाणं गेल्याच आठवड्यात लाँच झालं. चैतन्यने अल्ट बालाजीवरील 'बॉयगिरी' या वेबसीरिजमध्ये भूमिका केली होती.