हातात खोरं घेऊन साताऱ्यात अक्षयकुमारचं श्रमदान
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 12 Apr 2018 10:13 AM (IST)
साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक गावात अक्षयकुमार गावकऱ्यांसोबत श्रमदानात सहभागी झाला.
सातारा : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी खिलाडी अक्षयकुमार साताऱ्याच्या शिवारात दाखल झाला. हातात खोरं घेऊन अक्षयने गावकऱ्यांच्या मदतीने श्रमदानही केलं. अक्षयकुमार 'केसरी' सिनेमाच्या शूटिंगनिमित्त गेल्या दोन दिवसांपासून कोरेगाव तालुक्यात आहे. पिंपोडे बुद्रुक गावात अक्षयकुमार गावकऱ्यांसोबत श्रमदानात सहभागी झाला. अक्षयने यावेळी गावाच्या कामासाठी पंचवीस लाख रुपयांची मदत जाहीर केली. दोन दिवसांपूर्वीच 'पानी फाऊंडेशन'च्या वॉटर कप स्पर्धेला सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात अक्षयकुमार या गावात आल्यानंतर आपणही वॉटर कप स्पर्धेच्या श्रमदानात सहभागी होऊ, असा शब्द त्याने दिला होता. त्यानुसार बुधवारी पिंपोडे बुद्रुकच्या श्रमदानात सहभाग घेऊन अक्षयने आपला शब्द पाळला.