मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या रिलेशनशिपबद्दल मागील काही महिन्यांपासून सर्वत्र चर्चा आहे, हे प्रकरण तसं लपलेलं नाहीए. स्वत: रणबीर आलिया याबद्दल काही बोलत नसले तरी ते ही गोष्ट लपवतही नाहीत, त्यामुळे त्यांचं हे नातं आता इंडस्ट्रिमध्ये उघड आहे. मात्र याच चर्चांना आता एक नवी जोड लागली आहे ती म्हणजे रणबीर आलियाच्या लग्नाची.


दोघांच्या फॅन्सला ही आनंदाची बातमी आवडली असेलच, पण ही बातमी खरी आहे की नाही याची सुद्धा खात्री करायला हवी. या लग्नाची कहाणी एका पत्रिकेवरुन सुरु झाली, व्हॉट्सअॅपवर रणबीर आणि आलियाच्या लग्नाची एक पत्रिका फिरत आहे, एव्हाना तुमच्या व्हॉट्सअॅपवर ही पत्रिका आली असलेही.



आता लग्न म्हटल्यावर कधी होणार आणि कुठे हे प्रश्न मनात येतात, पत्रिकेनुसार रणबीर आणि आलिया पुढच्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये 22 जानेवारीला लग्नाच्या बंधनात बांधले जाणार आहेत आणि पत्रिकेत लग्नाचं ठिकाण जोधपूरच्या उमेद भवन पॅलेस आहे. पण यामागचं सत्य हे आहे की ही पत्रिका पूर्णपणे खोटी आणि फोटोशॉप केलेली आहे आणि रणबीर आलियाने लग्नाबद्दल काहीच माहिती दिलेली नाही.


सर्वप्रथम या पत्रिकेत आलियाच्या वडिलांचं नाव मुकेश भट्ट असं लिहिलं आहे आणि आलिया ही मुकेश नाही तर महेश भट्ट यांची मुलगी आहे, मुकेश तिचे काका आहेत. यावर इंग्रजीमध्ये लिहिलेलं ALIYA हे स्पेलिंगही चुकीचं आहे. या वेडिंग कार्डची क्वॉलिटी जरी पाहिली तरी हे एक बनावट खोटं वेडिंग कार्ड असल्याचं समजतं.


यावर आलियाला प्रश्न विचारला असता तिने हसूनच प्रतिक्रिया दिली, तिने यावर बोलणं टाळलं. ज्याने ही पत्रिका बनवली त्याला नक्कीच दोघांच्या लग्नाची उत्सुकता आहे हे तर समजलंच पण गंमत म्हणजे त्या व्यक्तीला स्वत:लाच माहीत नसेल या पत्रिकेत किती चुका आहेत.