Ramayana :  चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारीचा ड्रीम प्रोजेक्ट 'रामायण'चे (Ramayan Movie) चित्रीकरण सुरू झाले आहे. रामायण चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत पार पडत असून आता सेटवरून फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या सेटचा फोटो, व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता चित्रपटातील कलाकारांचा लूक व्हायरल झाला आहे. 


सोशल मीडियावर 'रामायण'च्या सेटवरून अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. या फोटो, व्हिडीओमध्ये लारा दत्ता (Lara Dutta), अरुण गोविल (Arun Govil) आणि शीबा चढ्ढा यांचा ऑनस्क्रिन लूक रिव्हील झाला आहे. छोट्या पडद्यावर राम म्हणून लोकप्रिय असणारे अभिनेते अरुण गोविल हे राजा दशरथच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचा  सेटवरून लूक व्हायरल झाला आहे. तर, दुसरीकडे ग्लॅमरस अभिनेत्री लारा दत्ता ही कैकयीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शिबा चढ्ढा मंथाराची व्यक्तीरेखा साकारत आहे. 






चित्रपटांसाठी 11 कोटींचा सेट?


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये 'रामायण'चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारीदेखील दिसत आहेत. चित्रपटाच्या सेटवरून समोर येणारी व्हिडीओ हे पौराणिक चित्रपटाच्या अनुषंगाने तयार केलेल्या लीक झालेल्या सेटची रचना दर्शवतात. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की हा सेट खूप मोठ्या पातळीवर तयार केला जात आहे. 'इंडिया टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार,'रामायण'च्या सेटसाठी निर्मात्यांनी 11 कोटी रुपये खर्च केले आहेत.






'रामायण'मध्ये कोणते कलाकार झळकणार?


नितेश तिवारी 'रामायण' तीन भागात प्रदर्शित करणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता रणबीर कपूर  हा  प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे आणि साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सनी देओल हनुमानाची तर बॉबी देओल कुंभकर्णाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल प्रीत सिंह शूपर्णखा आणि विजय सेतुपती हा विभीषणाच्या भूमिकेत दिसणार आहे.