Ramayana Movie updates Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरच्या ( Ranbir Kapoor) आगामी 'रामायण' (Ramayana) या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दिग्दर्शक नितीश तिवारीच्या (Nitish Tiwari) दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगला अंदाजे 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे. आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता रामायण हा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. अनेकदा निर्माते पहिल्या भागावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहूनच सिक्वेलवर काम सुरू करतात, परंतु कलाकारांच्या लूकमध्ये कोणताही बदल होणार नाही या कारणासाठी आता चित्रपटाचे दोन्ही भाग एकाच वेळी शूट करण्यात येणार आहे. 


पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, रामायण चित्रपटाशी निगडीत असलेल्या एका सूत्राने सांगितले की, नितेश तिवारी याने चित्रपट आता दोन भागात रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. रणवीर, साई पल्लवी आणि सनी देओल यांनी दोन्ही भागांच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. त्यासाठी जवळपास 350 दिवसांचे शेड्युल्ड तयार करण्यात आले आहे. या दरम्यान कलाकारांचे सोलो सिक्वेन्सचेही चित्रीकरण करण्यात येणार आहे. चित्रपटाचे मुख्य चित्रीकरण हे पुढील वर्षाच्या डिसेंबरपर्यंत संपवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू होणार आहे. 


रणबीरने लूकसाठी घेतलीय कठोर मेहनत


नितेश तिवारीच्या 'रामायण'चित्रपटात रणबीर कपूर हा प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. रणबीर कपूर हा आपल्या लूकवर खूप मेहनत घेत आहे. अॅनिमल चित्रपटानंतर रणबीरच्या लूकमध्ये ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत आहे. रणबीरच्या वर्क आउटचे काही व्हिडीओ, फोटोदेखील समोर आले होते. रणबीरसोबत या चित्रपटात अभिनेत्री साई पल्लवीही सीता माताच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांचे चित्रीकरण सुरू झाले आहे. रामायण चित्रपटाच्या सेटवरून दोघांचेही फोटो व्हायरल झाले होते. 


चित्रपटात या कलाकारांची वर्णी 


रणबीर कपूर आणि सई पल्लवी व्यतिरिक्त  'KGF स्टार' यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सनी देओल हा हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत दिसणार आहे. कुंभकर्णाची भूमिका बॉबी देओल साकारणार आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.


रणबीरचे आगामी चित्रपट


रामायण शिवाय रणबीरकडे संजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट आहे. यामध्ये रणबीर हा आलिया भट्ट आणि विकी कौशलसोबत झळकणार आहे. याशिवाय तो 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सिक्वेलचाही भाग असणार आहे. या चित्रपटात त्याची पत्नी आलिया भट्ट देखील असणार आहे.