R D Burman and Gulzar :  गीतकार गुलजार (Gulzar) यांच्या लेखणीतून आलेली गाणी चांगलीच लोकप्रिय आहेत. गुलजार यांनी वेगवेगळ्या धाटणीची गाणी लिहिली आहेत. गुलजार यांचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. गुलजार यांनी लिहिलेल्या एका गाण्यावर संगीतकार आर.डी. बर्मन (R.D.Burman) अर्थात पंचमदा यांनी तिरकस प्रतिक्रिया दिली होती. हा काय कचरा आणलास, ह्याला संगीत देऊ का, अशी प्रतिक्रिया पंचमदा यांनी दिली होती. हा किस्सा गुलजार यांनी स्वत:च सांगितला. 


गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इजाजत' या चित्रपटात 'मेरा कुछ सामान'  हे गाणं आहे. हे गाणं आजही लोक ऐकतात. मात्र, हे गाणं ज्यावेळी आर डी बर्मन यांच्याकडे गेले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काहीशी वेगळी होती. 


गुलजार यांनी सांगितला होता किस्सा


गीतकार, संगीतकार, शायर, लेखकांसाठीसोबत संवाद साधणारा मंच म्हणून 'जश्न-ए-रेख्ता' ची ओळख आहे. या विचारमंचावर अनेक कलाकारांनी आपली मते, इंडस्ट्रीतील किस्से सांगितले आहेत. काही वर्षांपूर्वी गुलजार यांनी हजेरी लावली होती. या दरम्यान गुलजार यांनी काही किस्से सांगितले होते. 


गुलजार यांचे शब्द आणि  आर.डी. बर्मन यांचे संगीत असलेली गाणी चांगलीच लोकप्रिय झाली आहेत. या दोघांची अनेक गाजलेली गाणी आहेत. आर डी बर्मन यांच्यासोबत काम करतानाचा एक किस्सा गुलजार यांनी यावेळी सांगितला होता. 


आरडी बर्मनबद्दल गुलजार यांनी सांगितले की, 'पंचमचा माझ्यावर विश्वास होता, मी काहीतरी विचित्र लिहितो यावरही त्याचा विश्वास होता... पण...तो बरोबर बोलत असावा असे गुलजार यांनी हसत सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की,  तेव्हा मी 'मेरा कुछ सामान' हे काहीसे दीर्घ गीत लिहिलं आणि त्याला दिले. त्यावर त्याने म्हटले की,  हा सीन चांगला आहे, तेव्हा मी म्हणालो की हा सीन नाही, गाणं आहे.''


गुलजार यांनी पुढे म्हटले की,'त्याने गाण्याचा कागद उचलला आणि म्हटले की हा कसला कचरा आहे? तू काहीही उचलून आणले तर गाणे बनवायचे म्हटले तर मी बनवू का? तू विचित्र मित्र आहेस, तुला काही कळत नाही. उद्या टाइम्स ऑफ इंडिया आणशील आणि म्हणशील की याचं गाणं तयार करायचा आहे. हे कसं होईल? असे त्याने विचारले. पण, पंचमने एवढं बोलूनही गाणं तयार केले. याचं कारण म्हणजे त्याचा माझ्यावर विश्वास होता. 


कोणत्या चित्रपटातील गाणं आहे?


1987 मध्ये प्रदर्शित झालेला 'इजाजत' हा चित्रपट स्वतः गुलजार यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचे संवाद, गाणी आणि चित्रपटाशी संबंधित सर्व काही गुलजार यांनीच लिहिले होते. त्यावेळी हा चित्रपट यशस्वी झाला होता आणि त्यातील गाणी सुपरहिट झाली होती आणि संगीत आरडी बर्मन यांनी दिले होते. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, रेखा आणि अनुराधा पटेल सारखे कलाकार दिसले. या  चित्रपटात तीन लोकांभोवती फिरणारी प्रेमकथा आहे. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता.