Maharaj Movie : सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth P Malhotra) दिग्दर्शित 'महाराज' (Maharaj) हा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलाच हिट झाला आहे. नेटफ्लिक्स आणि वायआरएफ एंटरटेनमेंटच्या पहिल्याच सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी भरभरुन प्रेम दिलं. अनेक देशांमध्ये दोन आठवड्यांपासून नॉन-इंग्लिश टॉप टेन लिस्टमध्ये हा सिनेमा तिसऱ्या स्थानावर आहे. आमिर खानचा (Aamir Khan) लेक जुनैद खान या सिनेमा मुख्य भूमिकेत आहे.
महाराज हा सिनेमा 21 जून रोजी नेटफिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये जयदीप अहलावत, शालिनी पांडे आणि शर्वरी वाघ यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दर्शित हिचकी हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा देखील जागतिक स्तरावर हिट ठरला आणि या सिनेमाने 235 कोटींचा गल्ला जमवला.
महाराजविषयी सिद्धार्थनं काय म्हटलं?
महाराजच्या यशाविषयी सिद्धार्थनं म्हटलं की, एक निर्माता म्हणून मी महाराज आणि हिचकी या दोन्ही सिनेमांमधून मानवी संघर्षाच्या कथा सांगण्यचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही सिनेमांनी भारतातून जागतिक स्तरावर यश मिळवलंय. मी सगळ्या प्रेक्षकांचेही आभार मानतो की त्यांनी महाराज सिनेमावर इतकं प्रेम केलं. या सिनेमातून आम्ही भारताच्या एका महान समाजसुधारक करसनदास मुळजींचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढे त्याने म्हटलं की, एखादा सिनेमा अनेक देशांमध्ये हिट होणं ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे आणि मी हा क्षण माझ्या संपूर्ण टीमसोबत साजरा करतोय. आम्ही खूप मनापासून हा सिनेमा बनवला आहे आणि मला याचा आनंद होतोय की अनेकांच्या मनाला हा सिनेमा स्पर्शून जातोय.
'महाराज'ची कथा काय?
'महाराज' हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित असून त्यात जुनैदसोबत जयदीप अहलावतची भूमिका आहे. हा चित्रपट 1862 च्या महाराज लिबेल केसवर आधारित आहे. हे प्रकरण भारतातील सर्वात महत्त्वाच्या कायदेशीर लढाईपैकी एक समजले जाते. चित्रपटात जुनैदने पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजीची भूमिका साकारली आहे. तर अहलावतने वल्लभाचार्य पंथाचे प्रमुख जदुनाथजी बृजरतनजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.