Kareena Kapoor Khan : भारतीय सिनेमात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी एक ताकदवान अभिनेत्री म्हणून करीनाचा (Kareena Kapoor Khan) उल्लेख कायम केला जातो. करीनाने नुकताच तिच्या करिअरचा 25 वर्षांचा टप्पा पार केला आहे. त्याचनिमित्ताने पीव्हीआर आयनॉक्स तिचे काही सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. करिनाचा नवा सिनेमा ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या सिनेमासोबतच तिचे इतरही सिनेमे पुन्हा प्रदर्शित केले जाणार आहेत.
‘द बकिंगहॅम मर्डर्स’ चे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले असून शोभा कपूर, एकता आर कपूर आणि करीना कपूर खान यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट बालाजी टेलिफिल्म्स, करीना कपूर खान, महाना फिल्म्स आणि टीबीएम फिल्म्स प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केला जात आहे.
हे सिनेमे होणार पुन्हा प्रदर्शित
यावेळी करीनाच्या संतोष सिवन यांचा 'असोका', सुधीर मिश्रा यांचा 'चमेली', इम्तियाज अली यांचा 'जब वी मेट', करण जोहर यांचा 'कभी खुशी कभी गम', आणि विशाल भारद्वाज यांचा 'ओंकारा' या सिनेमांचा समावेश आहे.
'गेल्या दोन दशकांचा प्रवास...'
करीनाने याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, गेल्या दोन दशकांचा प्रवास अत्यंत उत्साहवर्धक होता आणि मला तर हा कालच्यासारखा वाटतो. मला प्रचंड प्रेम असलेल्या या इंडस्ट्रीचा भाग बनण्याची आणि या इंडस्ट्रीने मला जे काही दिले आहे त्याचे कौतुक करण्याची संधी मिळणं खूपच छान आहे. माझ्या प्रवासाचा भाग बनलेल्या सर्व दिग्दर्शक, निर्माते आणि सहकाऱ्यांचे मी आभार मानू इच्छिते.
15 शहरांमध्ये होणार पुन्हा प्रदर्शित
मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, गुरगाव, नोएडा, पुणे, चंदीगड, लखनौ, जयपूर, इंदूर, हैदराबाद, भुवनेश्वर आणि त्रिवेंद्रम या शहरात हे सिनेमे पुन्हा प्रदर्शित केले जाणार आहेत.