नवी दिल्ली : ‘पद्मावत’ सिनेमाचा वाद संपताना दिसत नाही. सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीनंतरही चार राज्यांमध्ये सिनेमावर बंदी आणण्यात आली आहे. यामध्ये राजस्थान, हरियाणा या राज्यांच्याही समावेश आहे. या विरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टानेही यावर लवकरात लवकर सुनावणी करण्याचा विश्वास दिला आहे.


येत्या 25 जानेवारी रोजी ‘पद्मावत’ सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाच्या घोषणेपासूनच करणी सेना विरोध करत आहेत. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तर धमकी दिलीय की, जर ‘पद्मावत’ सिनेमाचं प्रदर्शन रोखलं नाही, तर सामूहक आत्महदहन करु. एवढंच नव्हे, सिनेमा प्रदर्शित झाल्यास तलवारी घेऊन सिनेमाचं प्रदर्शन रोखण्यासाठी थिएटरमध्ये जाऊ.

‘पद्मावत’ सिनेमाला वाढत जाणारा विरोध पाहता, राजस्थान सरकारने आधीच सिनेमावरील बंदीची घोषणा केली आहे. मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा या राज्यांमध्येही सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात आली आहे. याच विरोधात सिनेमाचे निर्माते आता सुप्रीम कोर्टात गेले आहेत.

या सिनेमात दीपिका पादुकोन, रणवीर सिंह आणि शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहेत. संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.

सिनेमाला वाढता विरोध लक्षात घेऊन, ‘पद्मावती’ सिनेमाचं नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात आले. त्याचसोबत, सेन्सॉर बोर्डाच्या सूचनांनुसार काही बदलही करण्यात आले. मात्र तरीही सिनेमाला होणार विरोध कमी झालेला नाही.