Premachi Goshta Latest Episode : मुक्ताने घरातील दागिने का नेले होते, यावरून कोळी कुटुंबात वाद सुरू आहेत. इंद्रा संतापाने लालबुंद झाली असून  मुक्तावर  नको ते आरोप करत आहे. मुक्ता दिलेल्या शब्दाला जागत काहीही भाष्य करत नाही. मात्र, तिचा नवरा सागर कोळी (Savani) आता स्वत: हून सत्य समोर आणणार आहे. तर, दुसरीकडे कोळी कुटुंबातील वादाने सावनीला (Savani) आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये नात्यांमधील असणाऱ्या शब्दाला आणि विश्वासाचे महत्त्व दिसून येणार आहे. 


इंद्रा मुक्तावर चांगलीच संतापली आहे. तर, मुक्ताची आई मुलीवरील आरोप फेटाळून लावत आहे. स्वत:चे दागिने नेण्याला चोरी म्हणतात का असा सवाल मुक्ताची आई इंद्राला करते. मुक्ताचे वडीलही मुक्ताला विचारणा करतात. पण, मुक्ता उत्तर देत नाही. मुक्ताची आई मुक्तावर विश्वास दाखवते. आपली मुलगी वेळ आली की सगळं काही सांगेल असे सांगते. संतापलेली इंद्रा आता मुक्ताला देवीसमोर उभी करून देवीची शपथ घेऊन सत्य सांगण्यास सांगते. पण मुक्ता देवीची शपथही घेत नाही. मुक्ता आईकडे रडत आपण कसलीही शपथ घेऊ शकत नाही असे सांगते. 


कोळी कुटुंबात वाद, सावनीला आनंदाच्या उकळ्या


कोळी कुटुंबात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी सावनी आदित्यकडून सईमार्फत माहिती काढण्याचा प्रयत्न करते. आदित्य सईला फोन करतो त्यावेळी सई रडत असते. त्यावेळी सई नकळतपणे सांगते की मुक्ताईला आजीने घराबाहेर जाण्यास सांगितले आहे. हे ऐकताच सावनीचा चेहरा चमकतो. सावनी सईला मी आहे ना असे सांगते. सई मला तू नव्हे तर मुक्ताई हवी असे सांगते. कोळी कुटुंबात सुरू असलेल्या वादाने सावनीला आनंद होतो.  सागर आणि इंद्राने मुक्ताला घराबाहेर काढले असे आनंदाने हर्षवर्धनला सांगते. सागर आणि मुक्ताचे लग्न मी मोडणार असल्याचे म्हटले होते आणि तेच केले. आता कोर्टात जावून सईची कस्टडी घेईल आणि मग माझ्यासोबत तुला लग्न करावे लागेल असे सावनी हर्षवर्धनला सांगते. 


सागर समोर आणणार मुक्ताचे सत्य 


इकडे कोळी कुटुंबात असलेल्या वादामुळे आम्हीच मुक्ताला घेऊन जातोय असे मुक्ताची आई म्हणते. पण मुक्ता तयार नसते. त्यानंतर इंद्रा मुक्ताला धक्का मारून घराबाहेर काढते. पण,  तेवढ्यात सागर येतो आणि मुक्ताला सांभाळतो. सागर मुक्ताला पुन्हा एकदा घरात आणतो. मुक्ता कुठेही जाणार नाही असे सागर इंद्राला सांगतो. सागर म्हणतो, चूक माझीच आहे आणि मी चूक सुधारत असल्याचे सांगतो. ज्या व्यक्तीने या घरची अब्रू राखली ती या घरची सून घराबाहेर जाणार नाही असे सागर बजावतो. सागरच्या या वक्तव्याने इंद्राला धक्का बसतो. नेमकं काय झालंय हेच तिला कळत नाही. 


त्यानंतर सागर सांगतो की, मागील अनेक दिवसापासून मुक्ता आपल्या घरची अब्रू वाचवण्यासाठी धडपड करतेय आणि आपणच तिला नको नको ते बोलतोय असे सागर म्हणतो. त्यावर तुम्हाला कळेल असे सागर सांगतो. त्यानंतर स्वाती आणि तिचा नवरा कार्तिकला बाळासह घरात आणतो. आपली मुलगी-जावई दुबईवरून आले याचा आनंद इंद्राला होतो. पण, स्वाती मुक्ता जवळ जात मुक्ता काळजी करू नको असे सांगते. आज भाईने (सागर कोळी) आम्हाला घरी आणले असल्याचे सांगते.  मी आणि कार्तिक दुबईला नव्हे तर इथे मुंबईतच राहत होतो असे स्वाती घरातील सदस्यांना सांगते. मुक्ताला झालेल्या त्रासाबद्दल कार्तिक माफी मागतो. मुक्ताने ते दागिने मला आणून दिले होते असे कार्तिक सांगतो. त्यावर इंद्राला काय सुरू आहे, याचा उलगडा होत नाही.