Pandu Movie New Song: पांडू (Pandu) सिनेमातील 'जाणता राजा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याद्वारे प्रविण तरडेंचा (Pravin Tarade) नवा लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. याआधी पांडू सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला होता. या टिझरलादेखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. टिझरमधून भाऊ कदम (bhau kadam) आणि कुशल बद्रिकेची (Kushal Badrike) जोडी दिसून आली होती. आता 'पांडू' सिनेमातील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे नाव 'जाणता राजा' असे आहे. या गाण्यात प्रविण तरडेंचा हटके लूक दिसून येत आहे. 


लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडेंनी आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून प्रविण तरडेंचा करारी बाणा प्रेक्षकांना बघायला मिळतो आहे. एक शिवप्रेमी, भारदस्त राजकीय व्यक्तीचं पात्र ते या सिनेमात साकारत आहेत. नुकतचं प्रदर्शित झालेलं 'जाणता राजा' हे गाणं शिवाजी महाराजांची महती सांगणारं आहे. या गाण्याच्या माध्यमातून प्रविण तरडेंचा लूक समोर आला आहे.  


जाणता राजा या गाण्याचे गीतकार समीर सामंत आहेत. तर हे गाणे अवधूत गुप्तेंनी संगीतबद्ध केले आहे. धारधार आवाजाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आदर्श शिंदेंनी हे गाणे जोशात गायले आहे. या सिनेमातील भूमिकेविषयी प्रविण तरडे म्हणाले,"या भूमिकेबद्दल मी कमालीचा उत्सुक आहे. हा लूक प्रेक्षकांसमोर कधी येतो याची मी स्वतः गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होतो. हे गाणं, हा लूक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे".  


झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या 'पांडू' सिनेमाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. तर चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे. मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज असलेला 'पांडू' हा येत्या ३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. लॉकडाऊनचा ताण अनलॉक करण्यासाठी प्रेक्षकांनी 'पांडू' सिनेमा बघायला हवा. पांडू सिनेमात भाऊ  कदम, कुशल बद्रिके, प्रविण तरडेंसह प्राजक्ता माळीदेखील एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात प्राजक्ता कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 


संबंधित बातम्या


Antim New Song: 'अंतिम' सिनेमातील गाणे प्रदर्शित, वलूचा डिसूजाची ठसकेबाज लावणी


Annaatthe Movie Box Office: रजनीकांत यांच्या 'अन्नत्थे' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सात दिवसांत केली एवढी कमाई


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha