Pravin Tarde : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी पुण्यात मतदानाचा अधिकार बजावला आहे. बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडे यांनी पुणेकरांना मोलाचा सल्ला दिला. पुणे (Pune) हे सुशिक्षितांचं शहर असून खूप विचार करुन मतदान करणारी माणसं या शहरात आहेत. त्यामुळे ते विचारपूर्वक मतदान करतील असं प्रवीण तरडे म्हणाले. तसेच प्रत्येकाने मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. 


प्रवीण तरडे काय म्हणाले? (Praveen Tarde on Lok Sabha Election 2024)


प्रवीण तरडे म्हणाले,"लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव साजरा करायला आलो आहे. मतदान करणं आपलं कर्तव्य आहे. ते प्रत्येकाने करायला हवं. आज शूटिंगलाही सुट्टी आहे. पुण्यात आज जल्लोषाचं वातावरण आहे. बहुदा पुणेकरांना देशाला कोणाची गरज आहे हे कळलं आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. गर्दीनेच जवळजवळ निकाल स्पष्ट केला आहे. पुणेकर मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले याचा आनंद आहे".


पुणेकर विचारपूर्वक मतदान करतील : प्रवीण तरडे 


प्रवीण तरडे पुढे म्हणाले,"उन्हाळ्या आधी मतदान करायचा पुणेकरांचा मानस आहे. पुणेकर आरोप-प्रत्यारोप मानत नाहीत. आरोप-प्रत्यारोप करणं हा राजकीय माणसांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे. जर त्यांनी ते केलं नाही तर लोकांना ते कोण आहेत हे कळणार नाही. विचार करुन मतदान करण्याचं मी मतदारांना आवाहन करतो. तुम्ही कितीही नाही म्हटलात तरी बऱ्याचशा गोष्टी या शहरात बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत. त्यामुळे शिक्षण असेल, सुशिक्षितांचं शहर असेल, खूप विचार करुन मतदान करणारी माणसं या शहरात आहेत. ते विचारपूर्वकच मतदान करतील".


तुमची जबाबदारी पूर्ण करा आणि आजच मतदान करा : सोनाली कुलकर्णी


अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली,"अपेक्षा घेऊनच आपण सर्व मतदान करायला बाहेर पडतो. आजचा महत्त्वाचा दिवस आपण वाया घालवला तर पुढची पाच वर्षे आपल्याला बोलायचा कोणताही अधिकार नसेल. तुमची जबाबदारी पूर्ण करा आणि आजच मतदान करा. घराबाहेर पडा आणि मतदान करण्याचं मी मतदारांना आवाहन करते. तुम्हाला हवं त्या उमेदवाराला मत द्या".


'पुष्पा' फेम अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआर, मेगास्टर चिरंजीवी, 'आरआरआर' कंपोजर एमएच कीरावनी या दाक्षिणात्य सुपरस्टारसह मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रवीण तरडे, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी अशा अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.


संबंधित बातम्या


Subodh Bhave : "बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन