Natya Sammelan Prakash Khot : 100 व्या ऐतिहासिक नाट्यसंमेलनाचा शुभारंभ येत्या 5 जानेवारीला पुण्यात होणार आहे. नाटक (Drama) म्हटलं की रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांसह बॅकस्टेज कलाकारदेखील आले. प्रकाश खोत (Prakash Khot) हे नाट्यवर्तुळातील एक नावाजलेलं नाव आहे. अनेक नाटकांच्या संगीत संयोजनाची धुरा त्यांनी सांभाळली आहे.


परदेशात नाटकाचा प्रयोग करणं हे कलाकारांपेक्षा रंगमंच कलाकारांसाठी जास्त आव्हानात्मक असतं. परदेशातले थिएटर्स, तिथल्या रंगमंच व्यवस्था यात कमालीचा फरक असतो. परदेशातील थिएटर्स अद्ययावत असतात. या सगळ्याचा अनुभव प्रकाशदादांना घेता आला. तिथल्या अद्ययावत थिएटर्स प्रमाणे आपल्याकडील नाट्यगृह देखील सुसज्ज असावीत, अशी इच्छा प्रकाश खोत यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात याची जास्त गरज आहे असही ते म्हणतात.


संगीताचा किमयागार प्रकाश दादा


'नातीगोती', 'असा मी असामी', 'एकदा पाहावं करून', 'नकळत सारे घडले', 'एक लग्नाची गोष्ट', 'शू कुठे बोलायचं नाही', 'चार दिवस प्रेमाचे', 'श्री तशी सौ' अशा अनेक नाटकांचे संगीत संयोजन प्रकाश खोत यांनी केले आहेत. या नाटकांच्या निमित्ताने अमेरिका, लंडन, पॅरिस, ऑस्ट्रेलिया, दुबई अशा अनेक देशांचा दौरा त्यांना करण्यात आला. विजय कोल्हटकर, विजय केंकरे, मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, वामन केंद्रे अशा मोठ्या नाट्यदिग्दर्शकांसोबत त्यांना काम करायला मिळालं आहे.


परदेशातील नाटकांच्या प्रयोगाबद्दल बोलताना प्रकाश खोत म्हणाले,"परदेशातील दौऱ्यात तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावं लागतं. त्याचा सराव करावा लागतो. परंतु प्रकाशदादा आता त्यात निष्णात झाले आहेत. त्यामुळे नवीन कोणतंही तंत्रज्ञान असलं तरी त्यतला बदल ते आत्मसात करतात".


सादरीकरणातील नाविन्य जपणारे प्रकाश दादा!


बॅकराउंड म्युझिक वाजवणं हे प्रकाशदादांचं मुख्य काम. संगीत संयोजनाच्या या तंत्रज्ञानात बदल होत आहेत. असे अनेक बदल दादांनी अवगत केले आहेत. सुरुवातीला स्टूल टेपरेकॉर्डरवर चालणारं काम पुढे म्युझिक पॅनेल, टॅब, लॅपटॉप, आयपॅड, आयपॅड अशा अनेकविध इन्स्ट्रुमेंन्टसह बदलत गेलं आणि हा बदल प्रकाशदादांनी शिकून घेतला आत्मसात केला. आपल्या सादरीकरणात नाविन्य जपलं. आधुनिक तंत्रज्ञान वेळोवेळी शिकून घेतलं. आज त्यांनी नाटकाच्या म्युझिक सिस्टीममध्ये स्वतचं स्थान तयार केलं आहे. मात्र केवळ यावरच न थांबता नवीन पिढीला मार्गदर्शन करीत तयारही केलं आहे. त्यांच्या हाताखाली तयार झालेली ही तरुण मंडळी याच संस्थेत काम करीत आहेत. 


प्रकाश खोत यांचा नाट्यप्रवास जाणून घ्या...


प्रशांत दामले यांनी आधी 'चंद्रलेखा' ही नाट्यसंस्था चालवायला घेतल्यानंतर प्रकाशदादा त्यांच्यासोबत काम करू लागले ते आजतागायत दामलेंसोबतच आहेत. प्रशांत दामलेंनी पुढे प्रशांत दामले फॅन फाउंडेशन व गौरी थिएटर्स ही स्वतची निर्मिती संस्था सुरु केली. या नाट्यसंस्थेने अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती केली. 


सुयोग नंतर प्रकाश दादांचा प्रवास प्रशांत दामले यांच्या नवीन संस्थेसोबत सुरू झाला. प्रशांत दामले फॅन फाउंडेशनने सासू माझी ढासू, नकळत दिसले सारे, बहुरूपी, कार्टी काळजात घुसली, संगीत संशयकल्लोळ, साखर खालेल्ला माणूस, एका लग्नाची पुढची गोष्ट, सारखं काहीतरी होतंय, तू म्हणशील तसं, नियम व अटी लागू ही संस्थेची सर्वच नाटकं लोकप्रिय ठरली आणि प्रेक्षकांच्या आवडीची ठरत आहेत. याही संस्थेत प्रकाशदादा संगीत संयोजनाचे काम करण्यात पुढे राहीले. आपल्या एकूण 37 वर्षांच्या कारकिर्दीत प्रकाशदादा गेली 35 वर्षे प्रशांत दामले यांच्यासोबत काम करीत आहेत. 


प्रकाशदादांना नाटकाने काय दिलं?


प्रकाश खोत म्हणाले,"आजपर्यंत या क्षेत्राने मला काय दिलं हा प्रश्न कधीच पडला नाही. अवघं आयुष्यच नाटकमय झालंय. रंगपीभूमीवरील वावर, कलाकारांचे घुमणारे संवाद, प्रकाशसावलीचा खेळ, विंगेतून अनुभवलेली टाळ्यांची दाद, पीठाच्या मागचा हास्यकल्लोळ आणि तिसरी घंटा याच्याशिवाय आयुष्यात इतर कशाचंच वेड जपलं नाही. त्यामुळे नाटकाने अवघं आयुष्यच दिलं असं मी म्हणेन".
  
नाट्यक्षेत्राचे संस्कार लाभलेल्या आणि त्या मुशीतून घडलेल्या कलाकारांपैकी एक असे प्रकाशदादा आजही प्रत्येक प्रयोगाला त्याच उत्साहाने रंगपीठात अवतरतात. म्युझिक पॅनेलच्या बटणांना सरावलेले हे हात त्याच सफाईने प्रत्येक धून वाजवतात आणि रंगमंचीय अवकाशातला हा रंग-प्रकाश-ध्वनी-संगीताचा खेळ त्याच बेमालूम पद्धतीने साकार होतो. हेच नाटकावरचं आणि नाटकवेड्यांचं प्रेम ही नाट्यकला कायम जिवंत ठेवत राहील.


संबंधित बातम्या


Natya Sammelan : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली नाट्यपंढरी सांगलीत; प्रशांत दामलेंनी घंटा वाजवून केली सुरुवात