Pooja Sawant Engaged : मराठी मनोरंजनसृष्टीतील 'कलरफुल' अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आज वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पूजाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या जोडीदारासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यानंतर तिचा होणारा पती कोण? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.


पूजाने केला चाहत्यांचा 'हार्टब्रेक'


पूजा सावंत ही मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मॉडेल म्हणून सुरू झालेला तिचा प्रवास एक दर्जेदार अभिनेत्री होण्यापर्यंत पोहोचला आहे. अभिनय आणि नृत्यासह आपल्या सौंदर्याने पूजाने सर्वांना वेड लावलं आहे. पूजा सावंत, वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) यांची चांगली मैत्री आहे. तिघांचं त्रिकूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतं. पूजा आणि वैभव-भूषणची निखळ, घट्ट मैत्री असली तरी त्यांच्या रिलेशनशिपच्या चांगल्याच चर्चा रंगल्या. पूजाचं नाव वैभव तत्तववादी आणि भूषण प्रधानसोबत नेहमीच जोडलं गेलं. 






पूजा सावंतचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीसोबत संसार थाटण्यासाठी अनेक चाहते उत्सुक होते. पण आता अभिनेत्रीच्या एका पोस्टने अनेक चाहत्यांचा 'हार्टब्रेक' झाला आहे. दुसरीकडे पूजाने वैभव किंवा भूषणसोबत लग्न करावं, अशी काही चाहत्यांची इच्छा होती. पण या चाहत्यांची ही इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे. 


पूजा सावंतचा होणार पती कोण? (Who is Pooja Sawant Husband)


पूजा सावंतने जोडीदारासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण जोडीदार नक्की कोण आहे? काय करतो? यासंदर्भात मात्र तिने काहीही माहिती दिलेली नाही. तसेच होणाऱ्या पतीचा चेहराही तिने दाखवलेला नाही. पूजा सावंतचा होणाऱ्या पतीचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र तो अभिनेता नसल्याचं समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, पूजा सावंतचा होणारा पती 
ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीचा मालक आहे. 


पूजा सावंत लवकरच अडकणार लग्नबंधनात (Pooja Sawant Wedding)


पूजा सावंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या लग्नासाठी चाहते आता उत्सुक आहेत. पूजाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पूजाने फोटो शेअर करत लिहिलं आहे,"आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात एका खास व्यक्तीसोबत, प्रेमाचा हा नवा प्रवास..we are engaged". 


संबंधित बातम्या


Pooja Sawant Engaged : पूजा सावंतच्या मनाचा धागा जुळला, जोडीदारासोबतचा फोटो शेअर, मोठी घोषणा