मुंबई : राजकीय चर्चांपासून दूर राहणारा अभिनेता सैफ अली खानच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सैफ अली खानने त्याच्या 'तानाजी : द अनंसंग वॉरिअर' सिनेमावर चर्चा करताना देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. तान्हाजी चित्रपटात इतिहासाचा चुकीचा अर्थ लावून चित्रण केल्याची गंभीर टिपण्णी अभिनेता सैफ अली खानने केली आहे.
तान्हाजी चित्रपटात सैफने मुघलांचा सेनापती उदयभान राठोडची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीत सैफ अली खानने इतिहास आणि सध्याची भारतातील स्थिती यावरही भाष्य केलं आहे. "इतिहासाचा चुकीचा अर्थ लावून तान्हाजी रंगवला जात होता, याची मला माहिती होती. पण व्यावसायिक यशासाठी अशा पद्धतीचा लोकप्रिय आणि चुकीचा ऐतिहासिक संदर्भ दिला जातो. उदयभानाची भूमिका खूपच आव्हानात्मक आणि मजेदार होती. त्यामुळे आपण ती स्वीकारली'' असं सैफने म्हटलं.
त्यानंतर सैफ अली खानने फिल्म इंडस्ट्रीतील ध्रुवीकरणावरही बोट ठेवलं. बॉलिवूडमध्ये बुद्धीजीवींचा आणि देशाचा सांस्कृतिक आवाज आहे. मात्र सध्या मुख्य प्रवाहातील कलाकारांनी लोकप्रिय भूमिका घेतल्याचं दिसत आहे, हे काही चांगलं नाही पण हेच वास्तव असल्याचं सैफ अली खानने म्हटलं आहे.
सैफ अली खानने पुढे म्हटलं की, एखाद्या विषयावर असहमती दर्शवल्यास देशात लोकांना मारलं जात आहे. सिनेकलाकारांनी एखाद्या मुद्द्यावर भूमिका घेतल्यास त्यांच्या सिनेमाच्या कमाईवर परिणाम होतो. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मात्र आता आपली भूमिका मांडण्याची वेळ आली आहे. सामाजिक मुद्द्यांवर कलाकारांनी भूमिका मांडली तर त्यांचे सिनेमे बॅन केले जातात. त्यामुळे सिनेकलाकार राजकीय भूमिका घेताना अनेकदा विचार करतात आणि असा गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.
सैफ अली खानच्या वक्तव्यावर भाजपची नाराजी
सैफ अली खानच्या वक्तव्यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. सैफ अली खान एक चांगला अभिनेता आहे. तो इतिहासाचं अपूर्ण ज्ञान घेऊन बोलत आहे. भारताचा इतिहास हजार वर्षांपूर्वीचा आहे. याची माहिती त्याला नसावी. त्याने राम राज्यापासून भारतीय इतिहासाची सुरुवात केली तर त्यांच्या लक्षात येईल की जग भारताला का मानत आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य करून सैफ अली खानने भारतीय इतिहासा खाली दाखवत इंग्रजांना मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे दुर्दैवी आहे, असं राम कदम यांनी म्हटलं.
संबंधित बातम्या
- BLOG : सिनेमॅटिक लिबर्टी आणि 'तान्हाजी'
- 'तान्हाजी' 100 कोटींचा मानकरी, बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच
- 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त करा, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी