मुंबई : स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्रातून केली आहे.


मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्या, हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा, यासाठी तो करमुक्त करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासात कोंढाणा किल्ला सर करण्याचा तानाजी मालुसरे यांचा प्रसंग ऐतिहासिक आणि विलक्षण आहे. शिवछत्रपतींचे विश्वासू सहयोगी म्हणून तानाजी मालुसरे यांनी जिवाची बाजी लावून हा महत्त्वाचा गड सर केला आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधिक शिवभक्त आणि मराठीजनांपर्यंत हा चित्रपट पोहोचणे आणि या ऐतिहासिक स्मृतींचे जतन होणे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच त्यांच्या शौर्याचे स्मरण होण्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी विनंती या पत्रातून मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने करीत आहे. अन्य राज्यांनी अशाप्रकारे निर्णय घेतला असल्याने तानाजींचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात हा निर्णय त्वरेने होणे गरजेचे आहे, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.


याआधी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली होती. युध्‍दाला सामोरे जाणारे तानाजी आमच्‍या श्रेष्‍ठ मराठी संस्‍कृतीचा मानबिंदु आहे. या चित्रपटाला रसिकप्रेक्षकांची प्रचंड पसंती सुध्‍दा मिळत आहे. या चित्रपटाला करमुक्‍त करुन शासनाने या वीर योध्‍द्याला मानवंदना द्यावी अशी मागणी मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्‍याकडे केली होती.

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यात तानाजी चित्रपट करमुक्त केला आहे. तीन दिवसांतच चित्रपटाने तब्बल 61.75  कोटी रुपयांची कमाई केली आहे. जर चित्रपट असाच पुढेही सुपरहिट होत राहिला, तर यावर्षीचा तानाजी हा चित्रपट पहिला ब्लॉकबस्टर असेल, असे तज्ञांनी म्हटले आहे.  'यूपीत करमुक्त केलेला तानाजी चित्रपट तुम्हीही अवश्य बघा. मलाही आनंद वाटेल', असे आवाहनही देवगणने सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ यांना केले आहे.

संबंधित बातम्या 

'तान्हाजी' सिनेमाचं तिकीट दाखवा आणि राजापूर कोंड्ये ते मुंबई प्रवास मोफत करा 

बेळगावात 'तान्हाजी' चित्रपटाला कर्नाटक नवनिर्माण सेनेचा विरोध, शो बंद पाडण्याचा प्रयत्न 

Tanhaji Movie Review | पुरेपूर लिबर्टी घेऊन केलेली शौर्यगाथा  

Tanhaji I 'तान्हाजी' चित्रपटातील 'त्या' दृश्यावर मालुसरे यांच्या वंशजांचा आक्षेप