मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा बहुचर्चित 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस आला. प्रदर्शनानंतर अवघ्या सहा दिवसात चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. महाराष्ट्रात चित्रपट तुफान गाजतोय, त्यासोबतच देशभरातही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.


अजय देवगण, सैफ अली खान आणि काजल स्टारर या चित्रपटाने शुक्रवारी 15.10 कोटी, शनिवारी 20.57 कोटी, रविवारी 26.26 कोटी, सोमवारी 13.75, मंगळवारी 15.28 कोटी रुपये आणि बुधवारी 16.72 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सहा दिवसात मिळून चित्रपटाने 107.68 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 100 करोड क्लबमध्ये स्थान मिळवणारा 'तान्हाजी...' या वर्षातला पहिला चित्रपट ठरला आहे.





दुसऱ्या बाजूला 'तान्हाजी...'सोबत प्रदर्शित झालेला दीपिका पादुकोणचा 'छपाक' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ठरला नाही. सहाव्या दिवशी छपाकने 2.61 कोटींची कमाई केली आहे. छपाकने शुक्रवारी 4.77 कोटी, शनिवारी 6.90 कोटी, रविवारी 7.35 कोटी, सोमवारी 2.35 कोटी आणि मंगळवारी 2.55 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने सहा दिवसांत एकूण 26.61 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.





'तान्हाजी...' हा चित्रपट हिंदवी स्वराज्याचे सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर गाजवलेल्या अतुलनीय शौर्याची कथा सादर करतो. कोंढाणा काबीज करण्यासाठी आपल्या घरातलं लग्न लांबणीवर टाकणारे, शिवरायांच्या शब्दासाठी, स्वराज्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणारे लढवय्ये तानाजी मालुसरे युद्धकलेत निपुण होतेच पण डाव प्रतिडाव आखण्यातही तरबेज होते. या सिनेमातून ते दिसतं. उच्च तांत्रिक मूल्य, पकड घेणारे युद्धाची दृश्य आणि ऐन युद्धात दिग्दर्शकाने दाखवलेली कल्पकता वाखाणण्यासारखी आहे. विशेषत: उदयभानने केलेली मराठा सैन्याची फसगत. कोंढाण्यावर चढाई करण्यासाठी वापरलेले बांबू. आदी अनेक गोष्टी पारणं फेडतात. सिनेमाचा शेवटही थरारक आणि अभिमानाने मराठी मन अधिक उंच करणारा. चित्रपट पकड घेतो.. व्यक्तिरेखा अधोरेखित करतो.