'टायगर जिंदा है'शी दोन हात करुन अखेर 'देवा'ने सव्वादोनशे स्क्रीन्स मिळवल्या आणि आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. 'देवा'बद्दल दोन गोष्टीमुळे कमालीची उत्सुकता आहे. एकतर यात अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी अशी तगडी कास्ट आहे. आणि दुसरी बाब अशी की हा मल्याळी चित्रपट चार्ली या चित्रपटाचा रीमेक आहे. चार्लीचा वेगळा फॅन फॉलोईंग आहे. त्यामुळे 'देवा'बद्दल कमालीची उत्सुकता आहे. मुरली नलप्पा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या सर्व तांत्रिक बाजू उत्तम आहे. सर्वच कलाकारांनी नेटका अभिनय केल्यामुळे हा चित्रपट किमान रंजन करतो.
पण, या गोष्टीच्या पोटात असलेला थरार, मानवी नातेसंबंधांची घालमेल साकारण्यात मात्र हा चित्रपट अपयशी ठरतो. पटकथेच्या उत्तरार्धात अनेक बाबी एकत्र आल्यामुळे सिनेमाचा फोकस शिफ्ट होतो आणि मूळ देवाच्या गोष्टीपासून हा सिनेमा लांब जाऊ लागतो.
मल्याळम चित्रपटाचं मराठीकरण करताना देवामध्ये अनेक संदर्भ बदलण्यात आले आहे. ते योग्य आहे. पण ते करत असताना स्थळ काळ वेळाची गोची इथे झालेली दिसते. त्यामुळे पूर्वार्धात उंचावलेला देवाचा ग्राफ नंतर मात्र कमकुवत होत खाली येतो.
सिनेमाची गोष्ट काहीशी अशी, माया ही एक यशस्वी लेखिका आहे. तिच्या पहिल्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता तिला दुसऱ्या पुस्तकाची ऑफर आहे, पण तिच्याकडे तसा विषय नाही. तो विषय शोधण्यासाठी ती कोकण गाठते. माणसांना भेटता भेटता सुचेल एखादी गोष्ट अशी तिची धारणा. याचवेळी कोकणात तिला राहण्यासाठी मिळतं देवाचं घर. हा देवा तिथे काही काळासाठी राहत असतो. त्या घरातल्या गोष्टी पाहून माया अवाक होते. त्याचवेळी तिच्या हाती एक चित्रकथा पडते. त्यातून तिची देवाबद्दलची उत्सुकता वाढते आणि या माणसाला शोधण्यासाठी ती एकेका माणसाला शोधत तिचा शोध सुरू होतो आणि त्या प्रत्येक माणसातून देवाचा नवा पैलू तिला दिसतो. तिचा शोध हाच या चित्रपटाचा प्रवास होतो.
जिथे कुठे शोध आला की ती कथा उत्कंठावर्धक व्हायला हवी. कधीमधी ती शमावी पुढे ती वाढावी या हिंदोळ्यावर सिनेमाने प्रेक्षकाला ठेवलं की तो चित्रपट आणखी रंजक आणि तितकाच धक्कादायी होतो. देवाबाबत पूर्वार्ध नेटका असला, तरी उत्तरार्धात जशी नव्या व्यक्तिरेखा येऊ लागतात तशी पटकथेवरची दिग्दर्शकाची पकड सैल होऊ लागते. विषय सोडून चित्रपट इतर माणसांची गोष्ट सांगू लागतो आणि मग अधेमधे देवा, माया दिसू लागतात. या प्रवासात देवा आणि माया यांचं तयार होणारं नातं दिसत नाही. त्यामुळे शेवटी मायाने घेतलेला निर्णय अनाकलनीय वाटतो. आणि हा सगळा पसारा नेमका का मांडलाय याची उकल होत नाही. उत्तरार्ध गडबडल्याने चित्रपटाचा पूर्ण टेम्पो कमालीचा हळू होतो. खोटा वाटू लागतो. चित्रपटाची सध्या जी ठेवण आहे ती दाक्षिणात्य सिनेमाला साजेशी असेलही कदाचित. पण मग सुरुवातीपासून ती तशी असायला हवी होती. सोयीनुसार त्याचा बाज बदलणं हे देवा चित्रपटाला घातक ठरतं.
पटकथेची बाब सोडली तर अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी यांनी संयमानं आपली व्यक्तिरेखा साकारली आहे. अंकुशला मोठ्या पडद्यावर पाहायला मजा येते. मोहन आगाशे, रीमा, पंढरीनाथ कांबळे, वैभव मांगले यांच्या व्यक्तिरेखाही छोट्या पण दखल घेण्याजोग्या. या चित्रपटाचं कथानक, छायांकन, संगीत, संकलन या सर्व बाबी नेटक्या असल्या तरी सिनेमासाठी आवश्यक असलेला गाभा अर्थात पटकथा कसून न बांधल्यामुळे हा सगळा ढाचा भुसभुशीत पायावर उभा असल्याचं जाणवतं. सगळं उत्तम असूनही हाती आलेला घास कुणीतरी काढून घ्यावा अशी काहीशी गत 'देवा'ची झाली आहे. असो बेटर लक नेक्स्ट टाईम.
REVIEW : पिक्चर-बिक्चर : तो बात बन सकती थी 'देवा'!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Dec 2017 03:44 PM (IST)
मल्याळम चित्रपटाचं मराठीकरण करताना देवामध्ये अनेक संदर्भ बदलण्यात आले आहे. ते योग्य आहे. पण ते करत असताना स्थळ काळ वेळाची गोची इथे झालेली दिसते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -