Palyad: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीचा झेंडा डौलानं फडकवणाऱ्या मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरत पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या 'पल्याड' या मराठी चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या 'फोर्ब्स' मासिकानं घेतली आहे. 'फोर्ब्स'नं दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांची संपूर्ण मुलाखत आणि चित्रपटाविषयीची माहिती त्यांच्या ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. फोर्ब्सने घेतलेल्या मुलाखतीमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांचा सोबत चर्चा करून चित्रपटाच्या संपूर्ण प्रवास समजून घेतलेला आहे. त्यामुळे आज सगळीकडे 'पल्याड'च्या नावाचा डंका वाजू लागला आहे. 'पल्याड'नं चित्रपटसृष्टीसोबतच रसिकांचंही लक्ष वेधण्यात यश मिळवलं आहे.


'फोर्ब्स'सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य मासिकात मराठमोळ्या दिग्दर्शकाची मुलाखत प्रकाशित होणं ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे. एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'पल्याड' या चित्रपटाची दखल 'फोर्ब्स'नं घेत संपूर्ण टिमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. शैलेश दुपारे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती चंद्रपुरातील व्हिजनरी व्यावसायिक व निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाईफ आणि लावण्य प्रिया आर्टसच्या बॅनरखाली केली आहे. के सेरा सेरा डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून 4 नोव्हेंबर रोजी 'पल्याड' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा स्मशानजोगी समाजातील परिवाराभोवती गुंफण्यात आली आहे. समाजातील भीषण वास्तव दाखवणाऱ्या 'पल्याड'सारख्या चित्रपटाला आपल्या मासिकात स्थान दिल्याबद्दल दिग्दर्शक शैलेश दुपारे यांनी 'फोर्ब्स'च्या संपूर्ण टिमचे मनापासून आभार मानले आहेत. शैलेश दुपारे म्हणाले की, 'फोर्ब्स' हे जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेलं मासिक आहे. यात स्वत:चं नाव पहाण्याचं स्वप्न अब्जावधींचा व्यवसाय करणारे जगभरातील असंख्य बिझनेसमन पहात असतात. जागतिक पातळीवर विक्रमी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची नावं या मासिकात प्रकाशित होतात. यांच्या पंक्तीत विराजमान होण्याचा मान 'पल्याड'सारख्या मराठी चित्रपटाला मिळणं ही जगभरातील मराठी भाषिकांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या सर्वांचं श्रेय 'पल्याड'ची संपूर्ण टिम, हस्ते-परहस्ते या चित्रपटाला सहकार्य करणारे असंख्य हात आणि रसिक मायबाप यांना देतो. समाजातील विविध स्तरांतून प्रदर्शनापूर्वीच 'पल्याड'चं होणारं कौतुक पाहून उर अभिमानानं भरुन आल्याचंही शैलेश दुपारे म्हणाले. 


शैलेश भीमराव दुपारे यांनी स्क्रिप्ट रायटिंग आणि फिल्म दिग्दर्शनाचा भारतीय फिल्म आणि टेलीविजन संस्थान पुणे येथून तीन वर्षाच्या पोस्ट ग्राज्यूट डिप्लोमा केला आहे. तसेच त्यांनी ता-यांचे बेट या चित्रपटाचे सह लेखन आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शन केले आहे. पल्याड हा त्यांचा दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. समाजातील रूढ जाचक चालीरीती, परंपरा, रितीरिवाज, प्रथा यांच्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात आजच्या काळातील महाराष्ट्रातील वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या विषयाची दाहकता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिने महोत्सवांमधील परीक्षकांनाही भावल्यानं या चित्रपटानं विविध पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटानं रसिकांच्या मनात उत्सुकता जागवली आहे. दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल नवी दिल्ली, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सिक्कीम, अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिव्हल मुंबई, नवी दिल्ली फिल्म फेस्टिव्हल, ब्लॅक स्वान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल कोलकाता, कोकण मराठी चित्रपट महोत्सव या चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कार पटकावले आहेत. याखेरीज सिनेक्वेस्ट व्हीआर अँड फिल्म फेस्टिव्हल यूएसए, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ एशिया टोरंटो, कॅलेला फिल्म फेस्टिव्हल स्पेन, इंटरनॅशनल कॅास्मोपॅालिटन फिल्म फेस्टिव्हल टोक्यो, एशिया आर्ट फिल्म फेस्टिव्हल हाँगकाँग, बॉयडन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल स्वीडन आणि रिचमंड इंटरनॅशनल फिल्म फस्टिव्हल युसएमध्ये चित्रपटाची अधिकृत निवड करण्यात आली आहे. 


या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यात, 25 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेला शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, देवेंद्र दोडके, वीरा साथीदार तसेच रुचित निनावे यांची वेशभूषा चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे आणि याचे संपूर्ण श्रेय वेशभूषाकार विकास चहारे यांना जात. विकास चहारे यांनी चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या पूर्ण अभ्यास करून सगळ्यांची चित्रपटाला अनुसरून वेशभूषा तयार केली आहे. चित्रपटाची कथा सुदर्शन खडांगळे यांनी लिहिली असून, सुदर्शन खडांगळे आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी पटकथा व संवादलेखन केले आहे. या चित्रपटात शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, बल्लारशहामधील बाल कलाकार रुचित निनावे, देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, सचिन गिरी, सायली देठे, भारत रंगारी, बबिता उइके, रवी धकाते, गजेश कांबळे आदींच्या भूमिका आहेत.