Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज जयंती आहे. जगभरातील चाहते आज लता दिदींना आदरांजली वाहत आहेत. 28 सप्टेंबर 1929 रोजी लता दीदींचा इंदूरमध्ये जन्म झाला. लता दीदींच्या चाहत्यांना त्यांचा जीवन प्रवास आता एका माहितीपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध  संगीतकार मयुरेश पै  हे करणार आहेत. 


लतादीदींचा जीवनपट उलगडणार 'सम्राज्ञी'डॉक्युमेंटरी


लतादीदींच्या जन्मदिनी अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स आणि  लतिका क्रिएशन्स हे सम्राज्ञी या माहितीपटाची निर्मिती करणार आहेत. लतादीदींचा जीवनपट उलगडणारी ही डॉक्युमेंटरी असणार आहे. मराठीतील  अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे.एल एम म्युझिकचे सीईओ -संगीतकार मयुरेश पै आणि ख्यातनाम निर्माते नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) या दोघांनी हे शिवधनुष्य उचललेलं आहे. ही डॉक्युमेंट्री मयुरेश पै (Mayuresh Pai) दिग्दर्शित करत आहेत. स्वरसम्राज्ञीला या कलाकृतीतून मानाचा मुजरा  करण्याचा हा प्रयत्न आहे.


लता मंगेशकरांचा 28 सप्टेंबर 1929 रोजी जन्म मध्य प्रदेशातील इंदूर शहरात झाला होता. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता दीदी या आपल्या बांधवांमध्ये सर्वात मोठ्या. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लता दिदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी शिवाजी पार्कवर जाऊन लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: