शुक्रवार आला की आपण वाट पाहातो ती नव्या सिनेमाची. पण यावेळी मात्र एक दिवस आधीच म्हणजे गुरुवारी चित्रपट प्रदर्शित होतोय. या सिनेमाचं नाव आहे बहुचर्चित असा पद्मावत.


संजय लीला भन्साळी यांच्या या नव्या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटाचं शूट सुरू झाल्यापासून हा सिनेमा सतत चर्चेत आहे. कधी सेट जाळले गेले तर कधी दिग्दर्शकाला मारहाण झाली. कलाकारांच्या नावाचे फतवे काढले गेले. आणि या अडचणी कमी म्हणून की काय, सेन्सॉर बोर्डाने आपला नियम दाखवत या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं. आणि आता अखेर २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे.

संजय लीला भन्साळी यांनी यापूर्वी केलेले चित्रपट पाहता सिनेमा या माध्यमाकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारा दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपला हा वकुब त्यांनी या चित्रपटातही पाळला आहे.

या सिनेमाचं शूट सुरू झाल्यापासून चर्चा होती ती या सिनेमात दिग्दर्शकाने घेतलेल्या सिनेमॅटिक लिबर्टीची. या सिनेमातही त्यांनी तशी लिबर्टी घेतली आहे. मग ते राणी पद्मावतीचं घुमर गाण्यातला नाच असो किंवा अल्लाउद्दीन खिल्जीचं खलबलीमधला नाच असो. एक नक्की की अशी लिबर्टी घेताना ऐतिहासिक व्यक्तिरेखांची मानहानी होऊ नये याची काळजी घेतली जायला हवी. ती इथे घेतलेली दिसते. राजपूत घराणं, राजा रतनसिंह, पद्मावती यांचा मान, आब राखत हा चित्रपट बनवला गेला आहे.

मलिक महम्मद जायसी यांच्या पद्मावत या काव्यावर हा सिनेमा बेतला आहे. ही गोष्ट राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिल्जी या कपटी सुलतान यांची आहे. राणा रतनसिंह यांची पत्नी पद्मावतीच्या सौंदर्याची महती खिल्जीच्या कानावर पडते. तिला पाहण्यासाठी तो चितोडकडे कूच करतो. तिला मिळवण्यासाठी चितौडला वेढा घालतो. पण शेवटी पद्मावती त्याच्या हाती लागण्यापेक्षा जौहर पत्करते हे तर आपण जाणतो. मग ही गोष्ट दिग्दर्शकाने दाखवली कशी हा यातला मुख्य मुद्दा आहे.

या संपूर्ण चित्रपटावर भन्साळी छाप आहे. अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणारा रणवीर सिंग, पद्मावती साकारणारी दीपिका पदुकोण आणि रतनसिंह यांची भूमिका करणारा शाहीद कपूर या तिघांनीही आपल्या भूमिकेला साजेसा अभिनय केला आहे. पण यातलं मोठं सरप्राइज पॅकेज आहे ते रणवीर सिंगचं. त्याने राक्षसी महत्वाकांक्षा असलेला अल्लाउद्दीन खिल्जी अफलातून रंगवला आहे. त्याच्या ताकदीला टक्कर दिली ती दीपिकाच्या सौंदर्याने आणि संवादांनी. तुलनेने शाहीद कपूरची यातली भूमिका किंचित दुय्यम आहे. पण त्याने धोरणी, तत्वनिष्ठ राजा नेटका रंगवला आहे. सिनेमा बघताना रणवीर सिंगचा अल्लाउद्दीन पाहता रतनसिंहसुद्धा थोडे धिप्पाड असते तर ती जुगलबंदी प्रेक्षणीय झाली असती असं वाटून जातं. या कलाकारांसोबत आदिती राव हैदरी, रझा मुराद यांनीही अपेक्षित अभिनय केला आहे.

खूप छोट्या छोट्या गोष्टीमधून अल्लाउद्दीनचा वेडसरपणा दिग्दर्शकाने दाखवला आहे. मग होळी दिवशी चेहऱ्याला रंग फासणं असो किंवा आपलंच रक्त आपल्या तोंडाला माखणं असो. पद्मावतीची चाणाक्ष बुद्धी दाखवतानाही प्रसंगांचं भान राखत तिच्या तोंडी असलेले संवाद तिच्या हुशारीची साक्ष पटवतात. यातील संगीतही चांगलं आहे. घुमर, एक दिल एक जान ही गाणी चांगली जमून आली आहेत. पण त्याचवेळी खलबली हे गाणं मात्र कानाला खटकतं. त्याची कोरिओग्राफी ही आजच्या काळातली वाटते.

नेटकी पटकथा, चांगले संवाद आणि अप्रतिम भव्यता यामुळे हा चित्रपट निश्चित प्रेक्षणीय होतो, खिळवून ठेवतो. म्हणूनच या चित्रपटाला पिक्चर बिक्चरमध्ये मिळतोय रेड हार्ट.