अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांना 21 वं ऑस्कर नामांकन
एबीपी माझा वेब टीम | 24 Jan 2018 10:45 AM (IST)
स्टीव्हन स्पिल्सबर्ग दिग्दर्शित 'द पोस्ट' चित्रपटातील कॅथरिन ग्राहम या भूमिकेसाठी मेरील स्ट्रीप यांना नामांकन मिळालं आहे.
न्यूयॉर्क : हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांनी पुन्हा एकदा स्वतःचाच विक्रम मोडित काढला आहे. अत्यंत मानाच्या ऑस्कर अर्थात अकॅडमी अवॉर्ड्ससाठी मेरिल यांना 21 व्यांदा नामांकन मिळालं आहे. 'द पोस्ट' चित्रपटातील कॅथरिन ग्राहम या व्यक्तिरेखेसाठी यावर्षी मेरील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नॉमिनेशन मिळालं आहे. मेरीलसोबत सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर), फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (थ्री बिलीबोर्ड्स आऊटसाईड एबिंग, मिसौरी), मार्गोट रॉबी (आय, टॉन्या), साओर्स रोनान (लेडी बर्ड) या अभिनेत्री स्पर्धेत आहेत. स्टीव्हन स्पिल्सबर्ग दिग्दर्शित 'द पोस्ट' चित्रपटातील कॅथरिन ग्राहम या भूमिकेसाठी मेरील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे, त्यामुळे त्या तगड्या दावेदार मानल्या जात आहेत. 68 वर्षीय मेरिल स्ट्रीप यांच्या नावे गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक ऑस्कर नामांकन पटकवण्याचा विक्रम आहे. यंदा त्यांना मिळालेल्या नामांकनाच्या संख्येत एकाने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ऑस्कर नामांकनांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर दोघींमध्ये टाय आहे. अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न आणि अभिनेते जॅक निकोलसन यांना प्रत्येकी 12 नामांकनं आहेत.