OTT Weekend Release : या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनासाठी प्रेक्षकांना चांगला पर्याय उपलब्ध असणार आहे.  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे चित्रपट ओटीटीवर घरबसल्या प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स ते डिस्नी प्लस हॉटस्टार, झी5, सोनी लिव्ह यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चित्रपट, वेब सीरिजची मेजवानी मिळणार आहे. शैतान, मंजुम्मेल बॉईज सारखे चित्रपट तर ब्रोकन न्यूज सारखी वेब सीरिज या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बुधवारी 1 मे रोजी बहुचर्चित हिरामंडी वेब सीरिज रिलीज झाली आहे. 


या वीकेंडला 3 मे ते 5 मे दरम्यान कोणते चित्रपट, वेब सीरिज कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार, यावर  एक नजर... 


शैतान Shaitaan Movie 


अजय देवगण, आर. माधवन, ज्योतिका यांची मुख्य भूमिका असलेला शैतान चित्रपट हा गुजराती चित्रपट वशचा रिमेक आहे. आनंदी कुटुंबात एका अज्ञात व्यक्तीची एन्ट्री होते आणि त्यांना संकटाच्या मालिकेला सामोरे जावे लागते. माधवन हा खलनायकाच्या भूमिकेत आहे. तो अजय देवगणच्या मुलीला संमोहनाने नियंत्रित करतो. त्याच्या जाळ्यातून सुटका करण्यासाठी अजय देवगण प्रयत्न करत असतो. 


कुठे पाहाल?


नेटफ्लिक्स ओटीटीवर 3 मे रोजी  हा चित्रपट रिलीज होणार आहे. 


'ब्रोकन न्यूज सीझन 2' Broken News Season 2 


'ब्रोकन न्यूज' वेब सीरिजचा पहिला सीझन सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता दुसरा सीझन रिलीज होणार आहे. प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातील स्पर्धा, राजकारण, पत्रकारांमधील स्पर्धा, त्यांचे वैयक्तिक आयुष्य या सगळ्यावर  कथानक बेतले होते. आता दुसऱ्या सीझनकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.  'ब्रोकन न्यूज' ही वेब सीरिज  ब्रिटिश सीरिज प्रेसची रिमेक आहे.  'ब्रोकन न्यूज'मध्ये सोनाली बेंद्रे, जयदीप अहलावत आणि श्रिया पिळगावकर यांची भूमिका आहे. 


कुठे पाहाल? 


झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 3 मे रोजी रिलीज होणार आहे. 



मंजुम्मेल बॉईज  Manjummel Boys


मल्याळम चित्रपट 'मंजुम्मेल बॉईज'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट सत्य घटनेवर आधारित सर्व्हायव्हल थ्रिलर आहे. तो केवळ मल्याळम भाषेतच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. परंतु लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी ते हिंदीतही OTT वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 


कुठे पाहाल? 


हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 5 मे पासून रिलीज होणार आहे. 


The Atypical Family 


कोरियन ड्रामा सीरिजचे चाहते असाल तर तुम्हाला ही वेब सीरिज मेजवानी ठरू शकते. या वेब सीरिजची गोष्ट एका कुटुंबाभोवती फिरते. या कुटुंबाकडे कधीकाळी सुपरपॉवर होती. पण बदल्या काळात त्यांच्याकडे असणारी सुपरपॉवर गमावतात. पण मग एक रहस्यमय स्त्री घरात प्रवेश करते आणि सर्व काही बदलते. या वेब सिरीजमध्ये 12 एपिसोड असतात. 


कुठे पाहाल? 


ही वेब सीरिज 4 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.