Oscars 2023 : बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्येदेखील पुरस्कार सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुरस्कार सोहळा म्हटलं की रेड कार्पेट आलं. कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटला (Red Carpet) खूप महत्त्व असते. रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींच्या अदा पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पुरस्कार सोहळा छोटा असो किंवा मोठा ग्लॅमरस लुकने रेड कार्पेटवर सेलिब्रिटी चाहत्यांना घायाळ करतात. 95 वा 'ऑस्कर पुरस्कार सोहळा' (Oscar Awards 2023) येत्या 12 मार्चला लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. पण 62 वर्षांत पहिल्यांदाच कार्पेटचा रंग लाल नसल्याची माहिती समोर आली आहे.
ऑस्कर पुरस्कार (Oscar Awards) सोहळ्याची जगभरातील सिनेप्रेमींमध्ये, सिनेविश्वातील कलाकार मंडळींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्यामुळे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटलादेखील तेवढेच महत्त्व आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर चालण्यासाठी सेलिब्रिटी कोणतीही कसर सोडत नाहीत. रेड कार्पेटवर आपण इतरांपेक्षा कसे वेगळे दिसू यासाठी सेलिब्रिटींमध्ये चांगलीच स्पर्धा रंगलेली असते. पण यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेट नसणार आहे. यंदा कार्पेटचा रंग बदलण्यात आला आहे. कार्पेटचा रंग बदलण्यात आल्याने सेलिब्रिटी मात्र नाराज झाले आहेत.
'ऑस्कर 2023'मध्ये कार्पेटचा रंग 'हा' असेल
1961 सालापासून ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटचा समावेश झाला आहे. तेव्हापासून कार्पेटचा रंग लाल होता. पण यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटचा रंग बदलण्यात आला आहे. 1961 पासून म्हणजेच 33 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यापासून दरवर्षी रेड कार्पेट अंथरले जाते. पण आता 62 वर्षांनी कार्पेटच्या रंगात बदल होणार आहे. ऑस्करचे नियोजन करणाऱ्या अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्सने यावेळी लाल रंगाऐवजी पांढरा रंग (White Color) निवडला आहे.
'ऑस्कर 2023' भारतासाठी खास
'ऑस्कर 2023' भारतासाठी खूपच खास आहे. एस.एस राजामौलीच्या 'आरआरआर' सिनेमातील नाटू नाटू गाण्याला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे. त्यामुळे आता 'ऑस्कर 2023' जगभरातील सिनेप्रेमींसह भारतीय सिनेप्रेमींचंदेखील लक्ष लागलं आहे. येत्या 12 मार्चला लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. तर भारतीयांना 13 मार्चला पहाटे 5.30 वाजता पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे.
संबंधित बातम्या