Satish Kaushik Death: ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद रित्या झाल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. ज्या फार्म हाऊसवर सतीश कौशिक थांबले होते. त्याठिकाणी पोलिसांनी तपासणी केली असता आक्षेपार्ह औषधं सापडली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. होळीच्या पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची पोलिसांनी लिस्ट तयार केली असून त्यातील एक उद्योजक सध्या फरार असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं आहे. 


फार्म हाऊसमधून पोलिसांना 'आक्षेपार्ह औषधं' सापडली


दिल्ली पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या टीमनं फार्म हाऊसवर जाऊन तपासणी केली असता पोलिसांना काही 'आक्षेपार्ह औषधं' सापडली. यानंतर पोलीस सतीश कौशिक यांच्या सविस्तर पोस्टमॉर्टम आणि व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत आहेत. त्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.


होळी पार्टीला आलेल्या पाहुण्यांची यादी पोलिसांनी तयार केली


पोलिसांनी होळी पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची यादीही तयार केली आहे, त्यावेळी सतीश कौशिक यांच्यासोबत जे लोक फार्महाऊसमध्ये होते, त्यासर्वांची यादी तयार केली आहे. सतीश कौशिकच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या उद्योगपतीचीही पोलिसांना चौकशी करायची आहे.