Urmi Marathi Movie : 'उर्मी' (Urmi) या मल्टिस्टारर सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेम आणि नात्यांची धमाल गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. येत्या 14 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'उर्मी'
राजेश जाधवने 'उर्मी' या सिनेमाच्या पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'उर्मी' या सिनेमाची स्टारकास्ट खूपच तगडी आहे. रसिका सुनील (Rasika Sunil), सायली संजीव (Sayali Sanjeev), चिन्मय उदगीरकर (Chinmay Udgirkar), नितीश चव्हाण, माधव अभ्यंकर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच ऋतुजा जुन्नरकर आणि सायली पराडकर अभिनेत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'उर्मी' कधी रिलीज होणार? (Urmi Movie Release Date)
पती-पत्नी यांच्या नात्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे काय धमाल होते असं सिनेमाची कथासूत्र असल्याचं सिनेमाच्या टीजरवरून जाणवत आहे. त्यामुळे उत्तम स्टाकास्ट आणि धमाल गोष्ट असलेल्या या सिनेमाविषयी उत्सुकता वाढली आहे. आता 14 एप्रिलला सिनेप्रेमींना सिनेमागृहात 'उर्मी' हा सिनेमा पाहता येणार आहे.
समृद्धी क्रिएशनच्या डॉ. प्रवीण दत्तात्रय चौधरी यांनी 'उर्मी' या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यांनीच सिनेमासाठी कथा आणि गीतलेखनही केलं आहे. डॉ. चैताली प्रवीण चौधरी आणि मालतीबाई दत्तात्रय चौधरी यांनी सिनेमाची सहनिर्माती केली आहे. राजेश बालकृष्ण जाधव यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनासह पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. विजय गटलेवार आणि उत्पल चौधरी यांनी संगीत, कौशल गोस्वामी यांनी छायांकन अनंत मारुती कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. तर महेश गोपाळ भारंबे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.
मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस
कोरोनाकाळात थंडावलेली मराठी सिनेसृष्टी आता पुन्हा बहरली आहे. 'वेड', 'वाळवी' या सिनेमांनी गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. लवकरच 'फुलराणी', 'रावरंभा', 'घर बंदुक बिर्याणी', 'बापमाणूस' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या धाटणीचे, विविध विषयांवर भाष्य करणारे मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
संबंधित बातम्या