मुंबई: बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेमादेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर जावा यासाठी सरकारचे मागील चार वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. यावर्षी 25 आणि 26 मे रोजी होणाऱ्या राज्य चित्रपट सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ऑस्करचे अध्यक्ष जॉन बेली यांना आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिली.


भारतात पहिल्यांदाच प्रमुख अतिथी म्हणून जॉन बेली यांची उपस्थिती असणार आहे. राज्य चित्रपट सोहळ्यादरम्यान जॉन बेली यांच्या पत्नी, अमेरिकन फीचर फिल्म एडिटर कॅरोल लिटीलटन या एडिटींग आणि सिनेमॅटोग्राफीचे वर्कशॉप्स घेणार आहेत.

राज्य चित्रपट सोहळ्यासाठी ‘ऑस्कर’चे अध्यक्ष जॉन बेली यांना निमंत्रण



यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जॉन बेली यांचीदेखील भेट होणार आहे. ऑस्कर कार्यालय मुंबईत आणण्याचा मुद्दा यावेळी मांडला जाईल. मुंबई चित्रपट सृष्टीतील कलाकार आणि काही दिग्गज हे पुढील 50 वर्षाच्या चित्रपट भविष्याबाबत चर्चा करणार आहेत. राज्य चित्रपट सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी जॉन बेली हे मास कम्युनिकेशन, मास मीडियाच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करतील. भारतीय चित्रपटाप्रमाणेच राज्यस्तरीय चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.